ब्रह्मपुरीत १० लाख ६२ हजारांची वीज चोरी उघडकीस
By Admin | Updated: January 11, 2017 00:38 IST2017-01-11T00:38:21+5:302017-01-11T00:38:21+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाने १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधी दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणत ३७.९४ लाखाची वीज चोरी पकडली.

ब्रह्मपुरीत १० लाख ६२ हजारांची वीज चोरी उघडकीस
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाने १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधी दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणत ३७.९४ लाखाची वीज चोरी पकडली. ही कारवाई सुरू असतानाच ब्रम्हपूरी येथे दोन मोठ्या वीजचोऱ्या सापडल्या. दोन्ही वीज चोऱ्या एकाच ग्राहकाकडे सापडल्या, हे विशेष!
ब्रम्हपुरी येथील रमेश चंपकलाल अग्रवाल यांच्या पटेलनगर येथील घरी महावितरण ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.डी.मेश्राम व चमूने धाड टाकून वीजमीटरची तपासणी केली असता, वीजचोरी होत असल्याचे आढळले. ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजचोरी करत करीत होता. यात ३३ हजार ९९५ वीज युनिट चोरी करून ५ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.
एक वीजचोरी सापडूनही सावध न झालेल्या या ग्राहकाने पत्नी सुशिला अग्रवाल यांच्या नावे असलेल्या तालुक्यातील उदापूर येथील वैश्णवदेवी स्टीम राईस इंडस्ट्रिज येथील वीज मिटरची तपासणी केली असता परत वीजचोरी आढळली. यात ३९ हजार ७०८ वीज युनिट चोरी करून ५ लाख १२ हजार ६८० रूपयांची वीजचोरी केल्याचे आढळले. (स्थानिक प्रतिनिधी)