गरजूंसाठी शहरात १० आरोग्य शिबिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:46 IST2019-01-16T22:46:12+5:302019-01-16T22:46:39+5:30
महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

गरजूंसाठी शहरात १० आरोग्य शिबिरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
आरोग्य शिबिर १५ ते २५ जानेवारी दरम्यान तुकूम, बालाजी वॉर्ड, वडगाव, एकोरी वॉर्ड, आनंदनगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, बंगाली कॅम्प, पठाणपुरा, लालपेठ, कृष्णानगर, नगिनाबाग वॉर्डात होणार आहेत.
यावेळी आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे उपस्थित होते. महापौर अंजली महापौर म्हणाल्या, आधुनिक काळातील जीवन अतिशय धकाधकीचे आहे, प्रत्येक व्यक्ती काहीनाकाही दडपणाखाली असतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. तणावामुळे कमी वयात हृदयरोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी ‘दवाखाना आपल्या दारी’ आणण्याची मोहीम सुरू केली. मधुमेह, खोकला, सर्दी, रक्तदाब या आजारांवर संबंधित वॉर्डात मोफत तपासणी केल्या जात आहे, असेही महापौर घोटेकर यांनी सांगितले.
डॉ. आंबटकर म्हणाल्या, पल्स पोलिओ, हत्तीरोग दुरीकरण, जीवनसत्व अ, जंतनाशक मोहीम, गोवर रुबेला मोहीम अशा विविध आरोग्यविषयक मोहीमा नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. डॉ. मोरे यांच्या सहकार्याने प्रत्येक शिबिरात स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशिअन, दंत चिकित्सक डॉक्टरांची सेवा उपलब्ध असणार आहे. २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला मोहिमेत ज्यांनी अद्याप एमआर लसीकरण केले नाही, अशा बालकाला शिबिरात मोफत लसीकरण केल्या जाणार आहे.
संवादामुळे वाढली जागृती
गोवर-रुबेला आजार हद्दपार करण्याची मोहीम शासनाद्वारे सुरु आहे. मनपा आरोग्य विभागाने अंमलबजावणी करत आहे. काही व्यक्ती, शाळांनी लसीकरणाला विरोध केला. परंतु आयुक्त काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबटकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने नागरिकांशी संवाद साधून लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे. मनपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण अजूनही सुरू आहे.