आगीत १० गोठे जळून खाक
By Admin | Updated: May 23, 2015 01:22 IST2015-05-23T01:22:52+5:302015-05-23T01:22:52+5:30
राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली.

आगीत १० गोठे जळून खाक
१२ लाखांचे नुकसान : दोन बैल जखमी; एका वासराचा मृत्यू
गोवरी : राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली. नागरिकांनी मिळेल त्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्हाळा असल्यामुळे आग आणखी वाढत गेली. तब्बल १० गोठ्यांना आगीने कवेत घेतले. या आगीत तब्बल १० लाखांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढविले आहे.
या घटनेत सर्वप्रथम हरिश्चंद्र कावळे यांच्या गोठ्याला आग लागली. मात्र ही आग लागल्याचे लक्षात आले तेव्हा बाजूला असलेल्या विजय आमने, दत्तु बोढे, दशरथ खिरटकर, मुर्लीधर सदाफळे, बंडू पिंपळकर, बाबा कावळे, मुर्लीधर वांढरे, मुर्लीधर पिंपळकर तर शंकर झिल्लेवार यांच्या घरातील गोठ्यांनाही आग लागली. पाहता पाहता आगीने जनावरांचे दहा गोठे कवेत घेतल्यानंतर पाण्यासाठी गावकऱ्यांनी धावाधाव केली. या आगीत दत्तु बोढे यांच्या गोठ्यातील एका वासराचा जळून मृत्यू झाला तर मुर्लीधर सदाफळे यांचे गोठ्यात बांधून असलेले दोन बैल जखमी झाले. गोठ्यात कडबा, कुटार, वखर, नांगर, मोटरपंप पाईप, शेती उपयोगी सर्व अवजारे जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस असलेले सर्व गोठे क्षणार्धात जळून खाक झाले. मात्र यावेळी वाऱ्याचा वेग मंदावल्याने शाळेला आग लागली नाही. शंकर झिलेवार यांच्या घराला आगीने कवेत घेण्याआधीच गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. किसन एकरे यांचे घर आगीतून बचावले. आग विझविण्यासाठी राजुरा, बल्लारपूर व अंबुजा सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीत दहा गोठे जळून खाक झाले होते. गोठ्याला लागून असलेल्या समाज भवानाच्या इमारतीत बाबा कावळे यांचे रासायनिक खताचे गोडावून होते ते ग्रामपंचायतीने किरायाने दिले होते. आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा तलाठी वी.बी. शेख यांनी केला. यावेळी ग्रामसेवक सचिन विरुटकर व गावकरी उपस्थित होते. ही आग शार्टशर्किटने लागली.(वार्ताहर)
पाचगाव येथेही आग
पाचगाव येथे लागलेल्या आगीत अनिल कुरवटकर व महादेव कुरवटकर यांचे घर जळाले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. यात त्यांचेही मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.