१ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत
By Admin | Updated: December 3, 2015 01:14 IST2015-12-03T01:14:57+5:302015-12-03T01:14:57+5:30
सरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते.

१ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत
सुधारित पैसेवारीसाठी प्रशासनाचे पत्र : चिमूर, भद्रावती, जिवती तालुके वगळले
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
सरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने १ हजार ८३६ गावांपैकी १ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचा सुधारित अहवाल महसूल व वनविभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. त्यामुळे भविष्यात ही गावे दुष्काळग्रस्त यादीत येण्याची आशा बळावली आहे.
चंद्रपूर जिल्हा धान, कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचा जिल्हा म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. मात्र यंदा अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धान पीक पार वाया गेले. कपाशीवरही लाल्या आल्याने या पिकानेही दगा दिला आहे. सोयाबीनचीही उतारी बरीच घटल्याने जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळाशी लढत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापूर्वी सरकाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. यामुळे प्रचंड रोष व्यक्त होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी महसूल यंत्रणेने पाठविलेल्या यादीनुसारचे पैसेवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगितल्याने जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवरील रोष वाढला होता.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी अलीकडेच सरकारला कळविली आहे. त्यात जिल्ह्यातील १ हजार ६८१ खरिप गावांपैकी १ हजार १९६ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाखाली दर्शविली आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून खरिपांची गावे एक हजार ६८१ आहेत. तर, १८ गावे पीक नसलेली आहेत.
त्यापैकी ४६७ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविली असून उर्वारित एक हजार १९६ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी दाखविली आहे.