१ लाख १७ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
By Admin | Updated: June 13, 2017 00:35 IST2017-06-13T00:35:06+5:302017-06-13T00:35:06+5:30
गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते.

१ लाख १७ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
चंद्रपूर : गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते. तर यावर्षी खरीप हंगामामध्ये मे अखेरीस ४५ हजार १५१ शेतकऱ्यांंना कर्ज वाटप करण्यात आले आहे.
या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज नसल्याने त्यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा बँकेने ७७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३३ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपये, राष्ट्रीयकृत बँकांनी ३३ हजार ३६१ शेतकऱ्यांंना २५९ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये आणि ग्रामीण विकास बँकेने ६ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४८ कोटी ३५ लाख ६०
हजार रुपयांचे पीककर्ज दिले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून ३५ हजार ३६०, राष्ट्रीयकृत बँक ८ हजार ५५० आणि ग्रामीण बँकेकडून १ हजार २४१ शेतकऱ्यांनी नवीन कर्जाची उचल केली आहे, अशीही माहिती सुत्राने दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन
२००८मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच विदर्भातील आत्महत्याग्रस्त अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच मोठ्या शेतकऱ्यांना कर्जसवलत देण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेअंतर्गत पाच एकपेक्षा अधिक शेती असलेल्या ६ हजार २२७ शेतकऱ्यांना ११ कोटी ११ लाख ५७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता.