Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:46 IST2017-07-26T16:27:09+5:302017-07-26T18:46:01+5:30
जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं. केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा, असं स्वत:ला आणि इतरांना सांगण्याची धमक आहे का आपल्यात?
Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.
-चिन्मय लेले
थ्री इडियटमधल्या व्हायरसचं ते वाक्य ऐकलंय ना? काय चुकीचं म्हणतात ते महाशय विरू सहस्त्रबुद्धे? ते म्हणतात ते खरंच तर आहे. ते विचारतात, वडील आजारी होते म्हणून खाना-पिना-नहाना-सांस लेना या गोष्टी सोडल्या का? नाही ना, मग ’’मी डिस्टर्ब होतो’’ म्हणून अभ्यास करणं, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करणं, आणि करता येणं शक्य असलेल्या अनेक गोष्टी स्वतर्चे लाड करत न करणं, जे केलं नाही, टाळलंच त्यासाठी कारणं सांगत राहतो, हे का करतो आपण? जी माणसं सतत कारणं सांगतात, ती कधीही यशस्वी होत नाही, हा जगाचा नियम आहे.
व्हायरसच्या त्या वाक्याचं वाईट वाटतं, म्हणजे अगदी कोरडेठाक दगड होऊन फिलिंग्ज डिलीटच मारून टाकायच्या का असा प्रश्न पडलाच असेल कुणाला? तर विचार करा, खरंच कारणं नाही देत आपण चालढकल करतो त्या कामांसाठी?
यार, कबूल करून टाकू ना, की फार कारणं सांगतो आपण. भयंकर एक्सक्यूज देतो. हे झालं म्हणून तसं झालं, ढिमकं झालं म्हणून मी टिमकं केलं.
ट्राफिक जाम होतं म्हणून आज मला लेट झाला.
घडय़ाळाचा गजरच झाला नाही म्हणून उशीरा उठलो.
मी नसतेच चिडत कधी, पण माणसं डोक्यात जातात म्हणून मी वसवसते.
मी शांतच असतो, पण लोकंच अशी वागतात की राग येतोच, मग बोलतो मी काहीतरी, लोकांना आधी धड बोलायला शिकवायला पाहिजे.
-कित्त्ती कारणं.!
जमेल तेव्हा, जमेल तशी कारणं देत आपली मान सोडवून घेण्याची कसरत करायला एकदम सरावलेलो असतो आपण.
नुस्ती कारणं सांगतो आणि जे जमलं नाही त्याचं खापर त्या कारणांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतो.
‘कारणे सांगा’ विषयात मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायला लागतात. आणि जे करणं शक्य असतं ते करणं आपण ‘कारणा’त घुसडून कधीच करत नाही.
म्हणजे बघा मॅच हरली म्हणून आपण विराट कोहली देतो ती कारणं खरी मानतो का? ते जाऊ द्या, आईबाबा आपल्याला एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा त्यांची कारणं खरी असली तरी आपल्याला पटतात का?
मग आपणच कोण असे तिसमारखां लागून गेलोय की, आपण सतत एक्सक्यूज देतो?
ही सतत एक्सक्यूज देण्याची सवयच समजा सोडून दिली तर.?
जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं.
जे केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा.
असा उद्धट अॅटिटय़ूड एकवेळ परवडला पण ही कारणांची लडच फूस्स करून टाकायला हवी.
आणि एखाद्या दिवशी झालाच उशीर तर सांगू ना बिन्धास की झोपून राहिलो गाढवासारखा.झाला उशीर!
नाहीच झालं काम तर सांगू स्वतर्लाही की आपण आळशी आहोत, हे असेच वागलो, तर एकदिवस फुकट मरू.
किती सोप्पं.
आपली जबाबदारी आपण घेऊन मोकळं व्हायचं. काही कारणं सांगायची नाहीत, काही झंझट नाही, काही खुलासे नाहीत.
बंद सगळं. नो एक्सक्यूजेस! ही एक सवय आपल्याला यशाच्या दिशेनं किमान काही पाऊलं तरी पुढं नेऊ शकते