Pension planer; A different career opportunity! | पेन्शन प्लॅनर; करिअरची एक वेगळी संधी!

पेन्शन प्लॅनर; करिअरची एक वेगळी संधी!

निवृत्तीनंतरचे जगणे सुसह्य बनवणारी पेन्शन ही एक आशादायक सोय म्हणता येईल. या सोयीचे नियोजन कसे करावे, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक ‘पेन्शन प्लॅनर’ही असतो याची माहिती फार कमी लोकांना आहे. मात्र, करिअर म्हणून याकडे पाहता येईल यात वाद नाही.
पेन्शन योजनेत सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पेन्शन सल्लागार म्हणून उत्तम करिअर संधी आहे. रिटायरमेंट अकाउंट उघडण्यापासून ते नवीन पेन्शन योजनेत कशा प्रकारे सहभागी व्हायचे, गुंतवणूक कशी करायची, गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यातील अडीअडचणी कशा सोडवायच्या याबाबत पेन्शन सल्लागार सर्वंकष मार्गदर्शन करू शकतो.
ही योजना विकण्यासाठी कोणताही एजंट किंवा ब्रोकर, अशी योजना केलेली नाही. या योजनेत विम्याप्रमाणे एजन्सी चॅनेल समाविष्ट केलेले नाही. सगळ्यात मुख्य म्हणजे ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांना स्वत:हून पी.ओ.पी.कडे संपर्क साधायचा असून, दरवर्षी स्वत:चे काँट्रिब्यूशन जमा करायचे आहे. निवृत्ती डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला ही योजना कार्यान्वित ठेवायची आहे.
पेन्शन सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. यासाठी पेन्शन अ‍ॅकॅडमीने पेन्शन मॅनेजमेंटवर एक विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात शास्त्रोक्त पद्धतीने पेन्शन सल्लागार म्हणून कसे काम करायचे, सभासदांना मार्गदर्शन करायचे आणि सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये किमान पदवी पास किंवा बारावी पास आणि किमान ३ वर्षांचा अनुभव यांना पेन्शन सल्लागार म्हणून काम करता येईल. यासाठी बेरोजगार तरुण-तरुणी, गृहिणी, निवृत्त विमा एजंट, सामाजिक कार्यकर्ते यांना चांगली संधी आहे. महिला बचतगटही यात उत्तम काम करू शकतात. कॉलेजमधील विद्यार्थीसुद्धा पेन्शन सल्लागार म्हणून काम करू शकतात.
या योजनेत प्रचंड स्कोप असून, यातील ग्राहकवर्ग खूप मोठा आणि विस्तृत आहे. तसेच प्रत्येक घरात कमावता पुरुष आणि त्याची पत्नी या दोघांसाठी नवीन पेन्शन योजनेत पेन्शन योजना सुरू करता येऊ शकेल. या क्षेत्राची सुरुवात आता होत आहे. जे लोक या वेळी पेन्शन सल्लागार म्हणून पदार्पण करतील त्यांना खूप मोठे करिअर घडविता येईल.
निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी नवीन पेन्शन योजना आता सर्वांना उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांपासून मिळवत्या स्त्रिया, बचतगटातील महिला, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, मोलकरणी यांपासून हमाल, मजूर, कामगार, कारागीर, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, विक्रेते, उद्योजक सर्वांना ही योजना उपलब्ध करून द्यायची आहे. सुखी आणि आत्मनिर्भर निवृत्ती हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
पेन्शन फंड्स हे वैयक्तिक सुरक्षिततेचे एक उत्तम साधन आहे. वृद्धापकाळातील गरजांसाठी स्वत:च्या तरुणपणातच आर्थिक तरतूद करणे हे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक बनले आहे. वैद्यकीय सुविधा आणि सुधारणा यामुळे आपल्या देशातील सरासरी आयुष्यमान वाढत आहे. येत्या वीस वर्षांत ते ८५ वर्षे वयापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. अशा वेळी निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे बनले आहे. पेन्शन सल्लागारांना पुढील काळात प्रचंड मागणी असणार आहे.

Web Title: Pension planer; A different career opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.