नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत ३०० हून रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.mbmc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीअंतर्गत एकूण ३५८ जागा भरल्या जाणार आहेत, यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य- २७ पदे, मेकॅनिकल- २ पदे, विद्युत- १ पद, सॉफ्टवेअर/प्रोग्रामर- १ पद), लिपिक-टंकलेखक- ३ पदे, सर्वेक्षक- २ पदे, प्लंबर- २ पदे, फिटर- १ पद, मिस्त्री- २ पदे, पंपचालक- ७ पदे, अनुरेखक- १ पद, इलेक्ट्रिशियन- १ पद, स्वच्छता निरीक्षक- ५ पदे, चालक-यंत्रचालक- १४ पदे, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी- ६ पदे, अग्निशामक- २४१ पदे, उद्यान अधीक्षक- ३ पदे, लेखापाल- ५ पदे, डायलिसिस तंत्रज्ञ- ३ पदे, बालवाडी शिक्षिका- ४ पदे, परिचारिका/अधीपरिचारिका- ५ पदे, प्रसविका- १२ पदे, औषध निर्माता/अधिकारी- ५ पदे, लेखापरीक्षक- १ पद, सहाय्यक विधी अधिकारी- २ पदे, वायरमेन- १ पद आणि ग्रंथपाल १ पदाचा समावेश आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांचे महत्त्वाचे आवाहन
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेबाबत महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी भरतीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी पैसे मागत असल्यास त्याला बळी पडू नये, असे आवाहन इच्छुक उमेदवारांना आवाहन केले. अशा प्रकारे पैशांची मागणी केल्यास त्याची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा महानगरपालिकेला कळवावी. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.