बना, स्वप्न साकारणारा किमयागार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:45 AM2018-06-25T00:45:02+5:302018-06-25T00:45:15+5:30

Dreamy, dream-maker! | बना, स्वप्न साकारणारा किमयागार!

बना, स्वप्न साकारणारा किमयागार!

Next

घर असावे घरासारखे , नकोत नुसत्या भिंती...! असं घर बनवताना प्रत्येकालाच वाटत असते. आपआपल्या आवडीनिवडीनुसार घर कसे असावे, याचा आराखडा मनात असतो. त्यानुसार घरातील अंतरंगही आपण ठरवतो. आजकाल वाढत्या महागाईच्या काळात कमी खर्चात आकर्षक घर सजविण्यावर लोक भर देत असतात. घराचे नूतनीकरण, सजावट या सगळ्या बाबींचा माणसाच्या भावनेशी संबंध असतो. व्यावसायिकरीत्या इंटीरियर डिझायनर्स हे काम करवून देतात.
बांधकाम कसे असावे? त्याची पद्धत, सुरक्षा व्यवस्था, कोणत्या ठिकाणी काय छान दिसेल? याबाबतीतले तांत्रिक ज्ञान त्याला असते. गृह सजावटीचे असंख्य प्रकार त्याला ज्ञात असतात. त्यानुसार आपल्याला हवे तसे स्वप्नातले घर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तो मदत करतो. आजकाल या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. काही खाजगी कंपन्याही अशा सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहेत. देशात मल्टीनॅशनल कंपन्याचा झपाट्याने विस्तार होत असल्याने रोजगाराच्या ुसंधी अगदी दारापाशी येऊन ठेपल्या आहेत.
काळानुसार नवा बदल स्वीकारत असताना देखील लोकांची कलेप्रती, संस्कृतीप्रती असणारी ओढ लक्षात घेता नूतन वास्तूला जुना टच देऊन पर्यावरणाशी नाते बांधण्याचा, ते कायम ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.

कामाचे स्वरूप : इंटीरियर डिझायनरचे मुख्य काम हे कलात्मक असते. ग्राहकाच्या आर्थिक कुवतीनुसार त्याच्या घराला सुंदर रुप देण्याचे काम तो करतो. घराच्या रचनेनुसार संगणकावर तो नकाशा आणि नियोजन बनवितो त्यानुसार ग्राहकाला ते पसंद पडल्यास पुढील कार्यवाही केली जाते. घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, नैसर्गिक वातावरण आदिबाबतची कामे तो व्यावसायिकरीत्या करून देतो.

करिअर संधी : गृह सजावटीच्या बाबतीत लोक आग्रही झाल्याने या क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यात नोकरी मिळू शकते. तसेच स्वत:ची फर्मही काढता येईल. पब्लिक सेक्टरमध्ये प्रशिक्षीत आणि कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची मागणी जास्त आहे. उदा. टाऊन प्लॅनिंग ब्युरो, मेट्रोपोलीटीन आणि क्षेत्रीय विकास डिपार्टमेंट इथेही काम मिळेल. व्यवसायाची आवड आणि धाडसाची तयारी असल्यास स्वत:चा व्यवसाय देखील वाढवता येईल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीस १५ ते २० हजारापर्यंत वेतन राहील. अगदी नामांकित कंपनीत चांगल्या पगाराच्या संधी आहेत. सध्या पॅकेज देण्यावरही भर राहतो. या क्षेत्रात कल्पनाशक्तीला विशेष वाव असल्याने त्यावरही तुमच्या वेतनाचे आकडे ठरू शकतात.

पात्रता : इंटीरियर डिझायनर होण्यासाठी बारावी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी (५५ टक्के गुणासहित) विषयातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आॅल इंडिया कॉमन टेस्टच्या माध्यमातून डिझाइन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या डिप्लोमासही प्रवेश घेता येतो.

आवश्यक गुण : या क्षेत्रात कार्यरत असताना ग्राहकाचे समाधान याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य, ग्राहकाला प्रभावित करेल असे व्यक्तिमत्व हवे. केवळ कलेची आवड पुरेशी ठरणार नाही तर तांत्रिक बाबीतही प्रभुत्त्वही असायला हवे. धैर्य, स्वभावातील मितभाषीपणाही महत्त्वाचा ठरतो. दोनपेक्षा अधिक भाषेचे ज्ञान आणि सौंदर्यदृष्टी असल्यास फायद्याचे होईल. प्रभावी जनसंपर्क असल्यास ग्राहक जोडण्यास त्याची मदत होते.

Web Title: Dreamy, dream-maker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.