‘पैशाचं’ कॅलेंडर आहे तुमच्याकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:38 IST2017-10-31T17:35:08+5:302017-10-31T17:38:55+5:30
घरात लावा हे कॅलेंडर आणि आपला पैसा वाढताना बघा..

‘पैशाचं’ कॅलेंडर आहे तुमच्याकडे?
- मयूर पठाडे
तुमचं वय काय? म्हणजे तुमच्या वयाशी तसं आम्हाला ‘कर्तव्य’ नाही, पण तुम्ही काय करता? तुमचं शिक्षण चालू आहे, काही कामधाम करता कि काही उद्योग? खरंतर त्याच्याशीही आम्हाला काहीच कर्तव्य नाही. तुम्ही काही कमवत असा किंवा नसा, पण तुमच्या खर्चाचं आणि कमाईचं कॅलेंडर तुम्ही बनवता की नाही हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या या कॅलेंडरनं आमचा काहीच फायदा नाही, पण हे कॅलेंडर जर तुम्ही बनवलं, त्या पद्धतीनं आपल्या येणाºया आणि जाणाºया पैशांचं काटेकोर नियोजन केलंत, त्याचा हिशेब ठेवलात, तर भविष्यात तुमचा खिसा गरम राहाण्याचीच शक्यता अधिक आहे.
अनेकांना वाटतं, आपण कमवत काहीच नाही किंवा कमाईच इतकी तुटपुंजी आहे, काही शिल्लकच राहात नाही, तर त्याचं नियोजन आणि प्लॅनिंग तरी काय करायचं?..
पण खरं म्हणजे याच काळात, म्हणजे ज्यावेळी तुमची मिळकत कमीत कमी किंवा काहीच नसते, त्याच काळात तुम्ही स्वत:ला आर्थिक शिस्त लावली, तर तुमच्या भविष्यासाठी त्याचा खूपच उपयोग होऊ शकतो. अर्थविषयक तज्ञांनी तर प्रत्येकानं स्वत:चं आर्थिक कॅलेंडर तयार करायलाचं हवं असा कळकळीचा सल्ला दिला आहे. प्रत्येक गोष्टीवर आपला किती खर्च होतो, समजा काही अतिरिक्त खर्च होत असेल तर त्याला आळा कसा घालायचा, कितीही कमी मिळकत असली तरी बचत कशी करायची, हे त्यातून कळतं. पैसा वाढवायचा, साठवायचा आणि भविष्यकाळासाठी, महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग करण्यासाठी आर्थिक कॅलेंडर ही पहिली पायरी आहे. एकदा पैसा कसा येतो आणि कसा जातो हे कळलं की मग तो कसा वाचवायचा आणि वाचलेल्या या पैशांतूनच तो कसा वाढवायचा, हे कळायला लागतं. त्यामुळे निदान या पहिल्या पायरीवर तरी आपण आहोत की नाहीत हे अगोदर तपासा, म्हणजे मग पुढच्या पायरीवर कसं जायचं तेही पाहता येईल..