धोनीइतकी चांगली आहे का तुमची निर्णयक्षमता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 11:50 IST2017-07-31T11:48:59+5:302017-07-31T11:50:24+5:30
उत्तम करिअर करायचं तर योग्यवेळी योग्य निर्णय घेता यायला हवेत!

धोनीइतकी चांगली आहे का तुमची निर्णयक्षमता?
- समिंदरा हर्डीकर-सावंत
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण लहान मोठे निर्णय घेतच असतो. अनेकदा तर आपल्या लक्षातही येत नाही की आपण निर्णय घेतलाय, त्याप्रमाणं कृतीही करतोय. तसं पाहता निर्णय घेणं, निवड करणं ही कला प्रत्येक व्यक्तीला सहज येत असते.
अगदी व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा आपण कधीतरी चिडून म्हणतो की, तुमचं तुम्ही ठरवा मी काहीही सांगणार नाही, निर्णय देणार नाही. हे म्हणणंसुद्धा एकप्रकारचा निर्णयच असतो.
व्यक्तिगत संदर्भात हे सारं सहज होतं, नकळत घडतं. कधी आपण जोखमीचे निर्णय जवळच्या माणसांना विचारूनही घेतो.
पण नोकरीत, कामाच्या ठिकाणी मात्र निर्णय घेणं हीसुद्धा एक कलाच आहे. एक महत्त्वाचं स्किल आहे. आता या स्किलला एक वेगळंच महत्त्व येतं आहे.
कारण नोकरीत काम करताना तुम्ही जेव्हा काही निर्णय घेता तेव्हा ते निर्णय फक्त स्वतर्पुरते मर्यादित नसतात. माझं मी पाहून घेईन असं म्हणून चालत नाही. तुम्ही घेत असलेल्या निर्णयांचा प्रभाव इतरांवरही पडत असतो. परिणाम इतरांशीही संबंधित असतात. आणि म्हणूनच तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेता की नाही, ते निर्णय घेण्याइतपत धाडस दाखवता की नाही हे वारंवार तपासलं जातं!
धोनी मॅचमध्ये योग्यवेळी योग्य निर्णय घेतो ही त्याची खासियत आहे, तेच त्याचं स्किलही आहे.
ते स्किल आपल्याकडेही यावं आणि आपण आपल्या टीमचं धोनी व्हावं म्हणून काही प्रयत्न करता येतील. शिकताही येईल हे स्किल.
त्यासाठी या काही साध्या सोप्या गोष्टी.
टेक इट ऑर लिव्ह इट!
1) निर्णय घ्यायला बिचकू नका. सारासार दृष्टिकोन ठेवा. व्यवहार ज्ञान वापरा. परिस्थितीचा पूर्ण आढावा घ्या. आणि मग योग्य वाटेल ते निर्णय घ्या. आपलं चुकेल हे डोक्यातून काढून टाका.
2) मला वाटलं म्हणून मी असं केलं, अशा म्हणण्याला व्यावसायिक जगात काही स्थान नसतं. निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहिती एकत्र करा. योग्य माहिती निवडली, तिचा अचूक विचार केला तर अचूक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढते.
3) निर्णय कुठलाही घ्या, तो शंभर टक्के बरोबरच ठरेल असं काही. अनिश्चितता हा कुठल्याही निर्णयाचा अपरिहार्य भाग असतोच. धोका असतो, असुरक्षितता आणि जोखीमही असते. तिथंच तर खरं कसब लागतं. त्यामुळे जोखीम पत्करायची तयार असणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
4) आपण म्हणतो पुरेशी माहिती जमवा पण अनेकदा निर्णय घेताना आपल्याकडे पुरेशी माहितीही नसते. अशावेळी शितावरून भाताची परीक्षा करत निर्णय घ्यावा लागतो.
5) कितीही महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतला तरी वास्तवाशी त्याचं नात असणं महत्त्वाचं. ‘हवा में तीर’ असं करून चालत नाही. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊच नयेत; पण ते घेतानाही आपण पुरेसा प्रॅक्टिकल विचार केलेला असणं महत्त्वाचं!
6) आपण हल्ली प्रत्येक गोष्टीत ऑप्शन काय याचा विचार करतो. तशा ऑप्शनचा विचार करा, नसतील तर निर्माण करा. मग प्रत्येक पर्याय पडताळून जो सर्वात उत्तम असेल, त्याची निवड करा.
7) कोणताही निर्णय पूर्णपणे भावनांच्या आहारी जाऊन घेऊ नका. निर्णय घेण्यामध्ये भावनांचा विचार करावा, परंतु भावना आणि वस्तुस्थिती यांचा तारतम्यानं विचार करणं गरजेचं! इमोशनली आणि घाईघाईत घेतलेले निर्णय हमखास गोत्यात आणू शकतात.
8) मुख्य म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करा. आपल्या निर्णयानं ऑफिसात कोणावर, कसा परिणाम होईल, काय रिअॅक्शन येतील याचा आधीच विचार करून ठेवा. त्यामुळे काही गडबड झाली तरी पुढं काय करायचं याचा निर्णयही आपण घेतलेलाच असतो.
9) नव्या जगाता डिसिजन मेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल ठरतं आहे हे विसरू नका.
10) चटचट निर्णय घेऊन पटपट कामाला लागणार्या आणि इतरांना कामाला लावणार्या माणसांची खरंतर आता चलती आहे.
त्यात तुम्ही आहात का?