Big opportunity in the field of pharmacists | फार्मासिस्ट क्षेत्रात मोठ्या संधी
फार्मासिस्ट क्षेत्रात मोठ्या संधी

आज बाजारपेठेत रोज नवनवीन औषधे येत आहेत. औषधाच्या अनेक कंपन्या भारतात आपले जाळे विस्तारत आहेत, अशा वेळी त्यांना सर्वात जास्त गरज असते ती फार्मासिस्टची. फार्मासिस्ट म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औषधांच्या दुकानात काम करणारा माणूस येतो, पण हे क्षेत्र फक्त एवढ्यापुरतेच सीमित नाही. याचा विस्तार बराच मोठा आहे, आज आपण याच क्षेत्राच्या विस्तार आणि रोजगार संधींबद्दल चर्चा करणार आहोत.
कामाचे स्वरूप
फार्मसी ही आरोग्यविज्ञान संबंधित शाखा आहे. औषधांसंबंधी संशोधन करणे, कोणते औषध कसे बनवले जावे, औषधाचे प्रमाण किती असावे, औषध कशा पद्धतीने दिले जावे, औषधांचे इफेक्ट आणि साइड इफेक्ट याचा अभ्यास करणे हे फार्मासिस्टचे काम आहे. औषधांच्या दर्जाची तपासणी (क्वालिटी कंट्रोल) करणे. औषधे बनविण्यासाठी संबंधित कायद्यांचा आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून विविध प्रक्रियांचा शोध घेणे. औषधांचा प्राणी आणि माणसांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे. औषधांच्या उपयोगासंबंधित, तसेच विक्री संबंधित माहिती पुरविणे, अशी अनेक महत्त्वाची कामे फार्मासिस्ट करतो. एक उत्तम फार्मासिस्ट बनण्यासाठी लाइफ सायन्सची आवड असणे आवश्यक आहे. तर्क शुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता, उत्तम संवाद कौशल्य गरजेचे आहे.
अभ्यासक्रम
बी. फार्म.ला प्रवेश मिळविण्यासाठी १२वी मध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय घेणे आवश्यक आहे, तसेच या विषयांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणे गरजेचे आहे. बी. फार्म.ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उतीर्ण झाल्यावर तुमच्या मेरिटनुसार प्रवेश दिला जातो.
१२ वी सायन्सनंतर डी. फार्म या २ वर्षांच्या डिप्लोमाला प्रवेश घेता येतो, तसेच १२वी सायन्सनंतर बी. फार्म या ४ वर्षांच्या पदवीधर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. बी. फार्म झाल्यावर एम. फार्म या २ वर्षांच्या मास्टर्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
एम. फार्म झाल्यावर पीएच.डी या डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. फार्मा. डी. या नव्या अभ्यासक्रमाचीही सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाला १२वी सायन्सनंतर प्रवेश घेता येतो. याचा कालावधी ६ वर्षे आहे. यामध्ये तुम्ही क्लिनिकल फार्मास शिकता. औषधांचे इफेक्ट, साइड इफेक्ट, त्याचे कंपोझिशन (त्यातील घटकांचा आभ्यास) अशा अनेक गोष्टी शिकता येतात. हा जास्त तपशीलवार, तसेच सखोल अभ्यासक्रम आहे. यानंतर, तुम्ही संशोधन, औषधे बनविणारी कंपनी, हॉस्पिटल अशा अनेक क्षेत्रात कार्यरत होऊ शकता.
रोजगार संधी
रुग्णालय
शासकीय विभाग जसे हेल्थ प्रोटेक्शन ब्रांच आॅफ डिपार्टमेंट आॅफ हेल्थ अँड वेलफे अर, पेस्ट कंट्रोल डिव्हिजन आॅफ अ‍ॅग्रिकल्चर, डिपार्टमेंट आॅफ नॅशनल डिफेन्स, प्रिव्हेंशिअल रिसर्च कौन्सिल, इनव्हार्यमेंटल डिपार्टमेंट.
विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून
औषधे बनविणाºया कंपनीमध्ये
औषधांचे दुकान (मेडिकल फार्मसी)
मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह
फूड आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्येही फार्मासिस्टना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
स्वयंरोजगार (स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये रजिस्टर झाल्यावर, तुम्हाला स्वत:चे औषधांचे दुकान सुरू करता येते.

Web Title: Big opportunity in the field of pharmacists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.