20% of your income will make your future happy | तुमच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा भविष्यात करील जादुई करामत
तुमच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा भविष्यात करील जादुई करामत

ठळक मुद्देज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा कमाईला सुरुवात कराल, त्या दिवसापासून आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढा.त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.आज वाचवलेले वीस टक्के तुम्हाला सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.

- मयूर पठाडे

आपल्याला जगण्यासाठी किती पैसे लागतात? खरंतर याचं उत्तर जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे. कारण नुसतं जगण्यासाठी फारसा पैसा लागत नाहीच, पण आपल्या वेगवेगळ्या अपेक्षा, गरजा आणि अडचणीच्या प्रसंगात किती पैसा आपल्याला लागेल याची मात्र काहीच शाश्वती नसते. त्यासाठी आपल्या हाती काही पुंजी असणं आवश्यक असतं. काही गरजा तर निव्वळ आर्थिक असतात.
तुम्ही जर काही लोन घेतलेलं असेल, तर त्याचे हप्ते भरायचे असतात. हे हप्ते जर वेळेवर भरले गेले नाहीत, तर त्यावर मोठा दंड बसू शकतो. भवितव्यासाठी काही गुंतवणूक करावी लागते. काही पैसा बाजूल काढून ठेवावा लागतो. रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग करुन ठेवावं लागतं.
या साºया गोष्टींसाठी वेळीच आपल्याला सारी तयारी करुन ठेवावी लागते. ती जर केली नाही, तर ऐनवेळी फारच तारांबळ होते आणि त्याचं टेन्शन खूप मोठं असतं.
त्यासाठीचा एक सर्वात सोपा उपाय आहे. तुम्ही अगदी विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला बचतीची आणि काही पैसे बाजूला काढून ठेवण्याची सवय लावली पाहिजे. अगदी आपल्याला जो पॉकेटमनी मिळत असेल तर त्यातूनही काही पैसा बाजूला काढला पाहिजे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा जेव्हा कुठल्याही माध्यमातून तुम्ही कमाईला सुरुवात कराल, अगदी त्या दिवसापासून तुम्ही आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढली पाहिजे. त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. अनेक जणांना काही अघटित घडल्यावर किंवा उतारवयात जाग येते, आपण काहीच प्लॅनिंग केलं नाही याचं. तसं करणं धोक्याचं आहे. आज आपल्या कमाईतले वाचवलेले वीस टक्के तुम्हाला नुसतं योग्य आणि शाश्वत, सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.
त्यासाठी कराल एवढं? काढाल आजपासूनच आपल्या कमाईतील वीस टक्के वाटा बाजूला?..


Web Title: 20% of your income will make your future happy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.