रानडुकराच्या हल्ल्यात मोताळ्यातील युवक जखमी
By Admin | Updated: April 5, 2016 01:45 IST2016-04-05T01:45:46+5:302016-04-05T01:45:46+5:30
जखमी युवकावर अकोल्यात उपचार; काबरखेड परिसरातील घटना.

रानडुकराच्या हल्ल्यात मोताळ्यातील युवक जखमी
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील काबरखेड येथे बकर्या चारत असताना महादेव मुकुंदा सोनोने या युवकावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. काबरखेड येथील महादेव मुकुंदा सोनोने (वय १६) हा युवक सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरातील संजय जैस्वाल यांच्या शेतालगत बकर्या चारत असताना अचानक एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महादेव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला झाल्यानंतर आजूबाजूच्या शेतकर्यांसह समाधान सोनोने यांनी रानडुकराला हुसकावले. जखमी युवकाला तातडीने बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तत्काळ अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. घटनेनंतर जखमी मुलाची आई यमुना सोनोने यांनी मदतीसाठी तहसीलदाराकडे धाव घेतली असून, परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तालुक्यात रानडुक्कर, लांडगा, बिबट, अस्वल, कोल्हा आदी हिंस्र प्राणी आहेत; मात्र शेतकर्यांना सर्वाधिक धोका हा रानडुकराकडूनच आहे.