येळगाव धरण तहानलेलेच!
By Admin | Updated: July 21, 2016 00:53 IST2016-07-21T00:53:54+5:302016-07-21T00:53:54+5:30
बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसानंतरही फक्त तीन दशलक्ष घनमीटर जलसाठा संग्रहीत झाला.

येळगाव धरण तहानलेलेच!
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
तालुक्यातील येळगाव धरणात फक्त २५ टक्के जलसाठा असून, बुलडाणा शहरवासीयांची तहान भागविणारे हे धरण मात्र मागील आठवड्यात संततधार पावसानंतही तहानलेलेच आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना झाल्यानंतर येळगाव धरणात तीन द.ल.घ.मी जलसाठा असून, येणार्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही बुलडाणा तालुक्यात आजपर्यंत ३२६ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे येळगाव धरणात मोठय़ा प्रमाणात जलसाठा येईल, अशी अपेक्षा होती. मात्र झालेला पावसामुळे फक्त जमिनीची तहान भागली. मात्र येळगाव धरण तहानलेलेच राहिले. या धरणाद्वारे बुलडाणा शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात चौथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षापूर्वी कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्य़ाच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र, मागील वर्षापासून परिस्थिती बदलली होती. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आतासुद्धा शहरात चार दिवसाआड मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. मात्र, येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून येळगाव धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा होणे आवश्यक आहे. या धरण परिसरात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.