कामगारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:21+5:302021-02-05T08:34:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत देणीबाबत शेकडो कामगारांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधक ...

कामगारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत देणीबाबत शेकडो कामगारांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी लेखी आश्वासन दिल्याने कामगारांनी आपले आंदोलन स्थगित केले.
जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत देणीबाबत कामगार संघटनेने सुप्रीम कोर्टात ३ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल २५ फेब्रुवारी २०२० रोजी कामगार संघटनेच्या बाजूने लागला. यामध्ये जिजामाता सह. साखर कारखान्यात उपलब्ध साखर विकावी. विक्री करून आलेली रक्कम त्यांच्याच सदस्यांनाच वाटप करावी, असे आदेश दिले होते. यासंबंधी २० नोव्हेंबर २०२० रोजी साखर विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, त्यानंतरही कामगारांना रक्कम मिळाली नाही. याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने जिजामाता साखर कामगार संघटनेने बुधवारी आंदोलन छेडले. या आंदोलनात ५०० पेक्षा जास्त कामगार सहभागी झाले होते. दरम्यान, लेखी आश्वासन मिळाल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी जिजामाता साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी, उत्तमराव जाधव, विनायक देशमुख, साबेरा बी पठाण, गायकवाड, डी.सी.नागरे, खरात, बळी, हमजामामू, भाग्यवंत, खालेदभाई, शिवानंद सांगळे आदींची उपस्थिती होती.
चौकट..
जिल्हा उपनिबंधकांचे लेखी आश्वासन
जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत देणीसंबधांचे बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान, कामगारांना त्यांच्या देणी देणेबाबत धनादेशाद्वारे तत्काळ रक्कम अदा करण्यासंबंधी कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन स्थगित केले.
फोटो: