महसूल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: April 21, 2016 01:57 IST2016-04-21T01:57:37+5:302016-04-21T01:57:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.

महसूल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
बुलडाणा : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ पटवारी, मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने २0 एप्रिल रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. या आंदोलनात जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी झाल्याने ग्रामीण व शहरातील नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी त्रास सहन करावा लागला. विदर्भ पटवारी, मंडळ अधिकारी संघाच्यावतीने बुधवारी जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. ऑनलाइन सात-बारा देण्यासाठी येणार्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात, ऑनलाइन सुविधा सक्षम होत नाही तोपर्यंत सात-बारा व इतर शेतीविषयक कागदपत्रे हस्तलिखित देण्याची परवानगी मिळावी, या मुख्य मागण्या घेऊन जिल्ह्यातील हजारो तलाठय़ांनी आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेचे जिल्हा शाखेचे अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.