The work of the Sindhkhedaraja development plan is stalled | सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प
सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीच्या तथा जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने मंजूर विकास आराखड्यातंर्गतचा सुमारे २५ कोटी रुपयांचा निधीच प्राप्त न झाल्याने पहिल्या टप्प्यातील कामे बंद पडली आहेत. दरम्यान, जोपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत दुसºया टप्प्यातील सोयी सुविधांच्या कामांना निधी उपलब्ध होण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे राज्यातील १९ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाच मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या विकासासाठीच निधी त्यात उपलब्ध केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीच्या विकास आराखड्याची कामे वेगाने पूर्णत्वास जावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकंडूनही प्रभावी प्रयत्न होत नसल्याचे समोर येत आहे. एकीकडे ज्यावेळी सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत २५ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मान्यता दिली, त्यावेळी मोठा गाजावाजा करून त्याचे श्रेय घेण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला; मात्र त्यानंतर खºया अर्थाने विकास कामांचा पाठपुरावा करून निधी उपलब्धतेसाठीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाल्याची बाबच यातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे १२ जानेवारी २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांनी जिजाऊ सृष्टीवरून सिंदखेड राजा नगरीचा विकास करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली २८ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करून विकास आराखड्यास मान्यता दिली होती. सोबतच  तीन जानेवारी २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर परिषदेत विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली होती; मात्र अद्याप हा निधीच उपलब्ध केला नसल्याने जी काही थोडी कामे सुरू होती तीही बंद पडली आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांचाही पाठपुरावा कमी पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच विकास आराखड्यातील कामांना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रारंभ झाला होता. दुसरीकडे राज्यातील १९ पर्यटन स्थळांना १०३ कोटी रुपयांचा निधी वितरीत होतो; मात्र मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीच्या पर्यटन विकासासाठी निधीच उपलब्ध होत नाही, याबाबतही साधा आवाज उठवल्या गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सिंदखेड राजाचे शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दुसरीकडे नागपुर येथील पुरातत्व विभागाचे एडीए सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता सिंदखेड राजा शहर विकास आराखड्यातंर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधी पैकी एक रुपयासुद्धा निधी कंत्राटदाराला मिळाला नसल्यामुळे कामे बंद असल्याचे ते म्हणाले. सोबतच आता आपली बदली झाल्याचेही त्यांनी सांगितले. १३ कोटींची कामे ठप्प आराखड्यातंर्गतची १३ कोटींची कामे दोन महिन्यापासून ठप्प आहेत. कामांसाठी निधीच दिला जात नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. वास्तविक मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीचा विकास करण्याची मोहिम ही तेज होणे गरजेचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही  आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. दोन कोटींचा निधी व्यपगत सिंदखेड राजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने २०१७-१८ मध्ये दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र हा निधीच खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे हा निधीच व्यपगत झाला. अखर्चित निधी खर्च करण्यासाठी पुन्हा मंजुरीचे सोपस्कार राज्य पुरातत्व विभागाकडून करण्यात आले. मात्र त्यास परवानगी दिल्या गेली नाही. त्यामुळे तीन  महिन्यापूर्वीच हा निधी सरेंडर करावा लागला. अन्य कामांचीही समस्या  पहिल्या टप्प्यातील कामांनाच निधी उपलब्ध नाही. जो पर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे होत नाही, तोवर दुसºया टप्प्यातील कामांना निधी मिळणार नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील पुरातत्व विभागांमध्ये तथा निधी उपलब्धतेच्या दृष्टीने स्थानिक आमदार या नात्याने डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यात समन्वय असणे गरजेचे झाले आहे. कोट आपणास येथे रुजू होऊन चार दिवस झाले आहेत. मंत्रालयात दोन दिवसानंतर बैठक आहे. तेव्हा निधी संदर्भातील माहिती मिळेल. - जया वहाने, एडीए, पुरातत्व विभाग, नागपूर

Web Title: The work of the Sindhkhedaraja development plan is stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.