अहो आश्चर्यम....! विहिरीतील पाणी अचानक झाले गरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 21:37 IST2021-07-19T21:35:52+5:302021-07-19T21:37:30+5:30
Sangrampur News : अकोली बु. येथील प्रकार : तलाठी, तहसीलदारांनी घेतले पाण्याचे नमूने

अहो आश्चर्यम....! विहिरीतील पाणी अचानक झाले गरम
संग्रामपूर : भूगर्भातील एक आश्चर्यकारक घटना संग्रामपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून वापरात असलेल्या विहिरीचे पाणी अचानक गरम झाले आहे. विहिरीतील पाणी गरम झाले तरी कसे? याबाबत ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक येथे १५ वर्षे जुनी खाजगी विहीर आहे. या विहीरीतून गेल्या पाच दिवसापासून गरम पाणी येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अचानक विहिरीतील पाणी गरम झाल्याने परिसरात चर्चांना वेग आला आहे. विहीर येथील भानुदास भगवान सोळंके यांच्या मालकीची असून घराजवळ बेंबळा नदी काठावर आहे. ही विहीर तब्बल ५० फूट खोल असून सोळंके कुटुंबीय दररोज याच विहीरीवरून पाणी भरतात. मात्र गेल्या पाच दिवसापासून या विहिरीतील पाणी चांगलेच गरम येत असल्याने ग्रामस्थ चकीत झाले आहेत. विशेष म्हणजे या विहिरी पासून २० ते २५ फूट अंतरावरील दुसऱ्या विहिरीचे पाणी थंड आहे. दरम्यान सोमवारी प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण व तलाठी पी. व्ही. खेडकर यांनी विहिरीची पाहणी केली. पाण्याचे नमूने घेतले आहेत. विहिरीतील पाणी अचानक गरम येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी असा प्रकार कधीच झाला नसल्याने भूगर्भशास्त्रज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तहसीलदार यांनी विहिरीची पाहणी केली असून विहिरीतून गरम पाणी येत आहे. पाण्याचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
-पी. व्ही. खेडकर, तलाठी, अकोली बुद्रुक