पाण्यासाठी महिलांचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 02:20 IST2017-06-11T02:20:13+5:302017-06-11T02:20:13+5:30
ग्रामपंचायत आवारात मडके व घागरी फोडून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध

पाण्यासाठी महिलांचा निषेध मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवधाबा: पंधरा ते २0 दिवस होऊनही पाणीपुरवठय़ाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायत आवारात मडके व घागरी फोडून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविल्याची घटना शनिवारी दुपारी देवधाबा येथे घडली.
देवधाबा येथे २२ गाव पाणीपुरवठा योजनेतून सध्या पाणीपुरवठा केला जातो; पण २0 दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने व दुसरा कोणताही पर्याय ग्रामपंचायत प्रशासनाकडे नसल्याने शनिवारला महिलांचा सहनशक्तीचा अंत झाला. या टंचाईविरुद्ध २00 ते २५0 महिला एकत्र येत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येत मडके व बांगड्या फोडून आपल्या उद्रेकाला वाट मोकळी करून दिली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी वर्गाशिवाय कोणताही पदाधिकारी किंवा सदस्य उपस्थित नसल्याने या महिलांनी आपला मोर्चा सरपंच नीता सपकाळ यांच्या घराकडे वळविला व त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली; मात्र त्यांनीही २२ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय कोणतीच उपाययोजना नसल्याचे यावेळी महिलांना सांगितले. त्यामुळे महिलांनी रोष व्यक्त केला.