पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 02:38 IST2017-03-25T02:38:57+5:302017-03-25T02:38:57+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सोनोशी येथील घटना.

पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा
सिंदखेडराजा, दि. २४- तालुक्यातील सोनोशी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा व तोपर्यंत दरवर्षीप्रमाणे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा त्वरित सुरु करावा, या मागणीसाठी सोनोशी येथील असंख्य महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समितीवर २४ मार्च रोजी हंडा मोर्चा काढला.
तालुक्यातील सोनोशी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी जनता त्रस्त आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या द्वारकाबाई सानप यांचा पाणी काढत असताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. त्यांना जबर मार लागला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी योजना राबवून दरवर्षीप्रमाणे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी सोनोशी येथील असंख्य महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये नागरिकांचासुद्धा मोठा सहभाग होता. मोर्चेकर्यांनी पंचायत समितीचे सभापती राजू ठोके व सहायक संवर्ग विकास अधिकारी एम.टी. सुळे यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी व्ही.एन. भाटकर यांची आजच बैठक झाली आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी कायमस्वरूपी निर्णय लवकरच घेऊ.
एम.टी. सुळे, बीडीओ, सिंदखेड राजा.