दारूबंदीसाठी महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: April 10, 2015 23:33 IST2015-04-10T23:33:48+5:302015-04-10T23:33:48+5:30
पहुरजिरा येथील महिलांची अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याची मागणी.

दारूबंदीसाठी महिलांचा मोर्चा
जलंब (जि. बुलडाणा) : दारूबंदीसाठी पहुरजिरा येथील गावकरी महिला व पुरुषांनी भारतीय युवा शक्ती संघटनेच्या नेतृत्वात १0 एप्रिल रोजी जलंब पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना धारेवर धरले. जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पहुरजिरा गावात मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारूविक्री होत आहे. याबाबत गावकर्यांनी तसेच भारतीय युवाशक्ती संघटनेच्यावतीने अनेक वेळा जलंब पोलीस स्टेशनला निवेदन देऊन गावातील अवैध दारूविक्री बंद करावी, याबाबत मागणी करण्यात आली; मात्र त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. परिणामी गावातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. तसेच गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्थासुद्धा धोक्यात येत आहे. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी तसेच अवैध दारूविक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १0 एप्रिल रोजी जलंब पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला.