दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:07 IST2017-07-18T00:07:24+5:302017-07-18T00:07:24+5:30
मलकापूर : गावातील अवैधरीत्या दारु विक्री विरुद्ध वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली.

दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गावातील अवैधरीत्या दारु विक्री विरुद्ध वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली, त्यामुळे पोलिसांनी वाघोळा येथे जाऊन दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई केली.
दारुबंदीकरिता वाघोळा येथील मातृशक्तीने एकत्र येऊन वाघोळा ते दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.वर धडक दिली. या मोर्चात अॅड.रावळ, सरपंच बाळू पाटील, उपसरपंच नितीन पाचपोळ, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाचपोळ, गजानन ठोसर, सुनील बगाडे आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. दरम्यान, दसरखेड एमआयडीसी पो.स्टे. आवारात ठिय्या देत महिलांनी दारु विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा तोपर्यंत परत घरी जाणार नाही, ही आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांनी महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या व तत्काळ वाघोळा येथे पोलीस कर्मचाऱ्यांची चमू रवाना केली. पो.कॉं.संजय निंबोळकर, दिलीप रोकडे व आनंद माने यांच्या चमूने वाघोळा येथे जावून दीपक मोरे या दारु विक्रेत्यास २० देशी दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले, तर पोपटराव मोरे यांच्या घरातून १२ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
या बाबीची कुणकुण लागताच इतर तिघे दारु विक्रेते यांनी स्वत:च्या घराला कुलूप ठोकून पोबारा केला होता. दरम्यान, ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते संतोष रायपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलनात सुमन कारंजकर, मीना मांडोकार, अनसूया मोरे, लता बावीसआणे, तुळसा तायडे, शांता सोनोने, शीला बावीसआणे यांसह इतर महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.