लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच खामगाव शहरात पाणीटंचाईचे सावट आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे बुधवारी दुपारी बाळापूर फैलातील महिलांनी पालिकेत धडक दिली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल दोन तास महिलांनी पालिकेत ठिय्या दिला. त्यामुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते.खामगाव शहराच्या विविध भागांत गेरू माटरगाव येथील धरणातून रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, गत काही वर्षांपासून बाळापूर फैलात अपुरा पाणीपुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील महिला आणि सामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. कामगार आणि वृद्ध महिलांची चांगलीच ससेहोलपट होत असल्याने, संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी दुपारी पालिकेत धडक दिली. पालिकेतील संबंधितांकडून समाधानकारक तोडगा न निघाल्याने, संतप्त महिलांनी चक्क पालिका आवारात ठिय्या मांडला. सुमारे दोन तासांपर्यंत महिलांचे आंदोलन पालिकेत सुरू होते. गेल्या दहा ते १२ दिवसापासून येथे पाणीटंचाई आहे.
पाण्यासाठी खामगावातील महिला पालिकेत धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:06 IST