लाचखोर कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला अटक
By योगेश देऊळकार | Updated: February 12, 2024 20:56 IST2024-02-12T20:55:47+5:302024-02-12T20:56:06+5:30
लाचलुचपत विभागाच्या पथकाने मलकापूर पोलिसात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

लाचखोर कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला अटक
मलकापूर : आरओ प्लाँटच्या औद्योगिक वीज मीटरमधून कृषीपंपाला वापरलेल्या विजेबाबत गुन्हा दाखल न करणे तसेच सरासरी देयक कमी करण्यासाठी लाच मागणाऱ्या वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला अॅंन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापूर तालुक्यातील एका गावातील आरओ प्लाँट संचालकाने लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. त्यामध्ये वीज वितरण कंपनीचे ग्रामीण भाग ३ मध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता आकाश सुरेश क्षिरसागर, वायरमन महादेव कटू पारधी या दोघांनी विजेच्या चोरीचा गुन्हा दाखल न करण्याबाबत व सरासरी देयक देण्यासाठी ४० हजार रुपये लाच मागत असल्याचे नमूद केले. त्याबाबतची पडताळणी २९ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यात वायरमन महादेव कटू पारधी यांनी कनिष्ठ अभियंता आकाश सुरेश क्षिरसागर याच्यासाठी पूर्वी ६० हजार रुपये घेतल्याची स्पष्टोक्ती देऊन तडजोडीअंती २० हजार रुपये लाच मागितल्याच स्पष्ट झाले. १२ फेब्रुवारी रोजी सापळा कारवाईत तक्रारदाराव संशय आल्याने लाच स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी करण्यात आल्याच स्पष्ट झाले. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला सोमवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने मलकापूर पोलिसात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकाँ प्रवीण बैरागी, नापोका जगदीश पवार, गौरव खत्री, शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, चालक नितीन शेटे, अर्शद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.