बुलडाणा जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 19:40 IST2017-06-07T19:40:15+5:302017-06-07T19:40:15+5:30
चार दिवसात चौघाचा मृत्यू, १५ जखमी, ३१ गावे प्रभावित

बुलडाणा जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हाभरात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने १ जून रोजी हजेरी लावली. पावसाची ही परिस्थिती आजही कायम आहे, जिल्ह्यातील विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा आणि पावसामुळे मोठे नुकसान केले. यात केवळ चार दिवसात ३१ गावे प्रभावित झाली. दरम्यान चौघांवर मृत्यू ओढावला, १५ नागरिक जखमी झाले. शिवाय घर, शाळांची पडझड झाली. विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.
जिल्ह्यात १ जून पासून वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. १ जून ते ७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यत जिल्ह्यात ४४.२ मि.मी पावसाची नोंद घेण्यात आली. याची सरासरी ६.२० टक्के नोंदविण्यात आली. गत वर्षी ७ जूनपर्यत केवळ ८.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे यंदा पडलेला पाऊस निश्चित जास्त तिव्रतेचा आहे. पावसादरम्यान पडलेल्या विजा आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील सरंबा, भालेगाव, मंगरुळ नवघरे, शेलगाव आटोळ, देऊळगाव धनगर,गिरोला, धोडप, पेडका, वळती, देऊळगाव वापसा, किनगावराजा, हिवरखेड, मोताळा,रोहीणखेड, धामणगाव बढे, ब्राम्हंदा, रोहिणखेड, पोफळी, सारोळा मारोतीसह, पिंप्रीगवळी, वरदडत्त, इसोली, देऊळघाट, हतेडी, पाडळी, धाड, अमडापूर, हिवराआश्रम ही ३१ गावे प्रभावित झाली. यामध्ये शाळा व घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू, विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
विजपडून चौघांचा मृत्यू, १५ जखमी
विज पडून २ जून रोजी भालेगाव येथील रुक्मिणा धोंडगे मृत्यू झाला, तर यात तीन जखमी झाले. ३ जून रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव वापसा येथील विजय गरकळ व संतोष गरकळ व सुरेश काळे यांचा मृत्यू झाला. शेलगाव आटोळ येथे अरुण काशिनाथ बोर्डे, देऊळगाव धनगर येथे समाधान रंगनाथ खंडारे व कचरू बावसकर विज पडून जखमी झाले. रोहिणखेड येथील महिला वादळी वाऱ्यामुळे तसच वरदडा येथील घरावरील टिनपत्रे पडून गोदावरी आनंदा गवई ही महिला गंभीर झाली. तर ५ जून रोजी देऊळघाट येथे वादळामुळे उडालेली टिनपत्रे लागल्याने ७ जण जखमी झाले.
चार दिवसातील नुकसानीचा आलेख
मृतक - ०४
जखमी - १५
जनावरांचा मृत्यू - ०८
प्रभाविती घरे - २००
पुर्णत: पडलेली घरे - २०
पाच शाळांचे नुकसान
१५ गावांमध्ये विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.