खामगाव तालुक्यात वादळी पाऊस
By Admin | Updated: June 8, 2016 02:04 IST2016-06-08T02:04:09+5:302016-06-08T02:04:09+5:30
नुकसानाचे प्राथमिक अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आले.

खामगाव तालुक्यात वादळी पाऊस
खामगाव : विजांच्या कडकडाटांसह सोमवारी परिसरात पाऊस झाला. दरम्यान, रविवारी व सोमवारी झालेल्या नुकसानाची महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानाचे प्राथमिक अहवाल तलाठय़ांनी तयार केले असून, महसूल विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. खामगाव तालुक्यात रविवारी वादळी वार्यासह पाऊस झाला, तसेच सोमवारीसुद्धा वादळी वार्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. दोन दिवस झालेल्या पावसात वीज पडून गारडगाव येथे एकाचा मृत्यू झाला तर गोंधनापूर, हिवरखेड येथे दोन बैलाचांही वीज पडून मृत्यू झाला. कोंटी व बोथा (फॉरेस्ट) येथील जि.प. च्या शाळेवरील पत्रे उडाली, तर बोथा येथील शाळेच्या आवाराची भिंत कोसळली आहे. रोहणा, वर्णा, सारोळा, अंत्रज, कोंटी येथे फळबागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कंझारा येथील शे.महेमुद शे.आझम यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने आरेफाबी शे.महेमुद व शे.तौसीफ शे.महेमुद यांना मार लागल्याने ते जखमी झाले. रोहणा येथील पारधी वाड्यावरील तसेच गारडगाव, कोंटी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीची सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, प्रभारी तहसीलदार कुणाल झाल्टे, पं.स. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी पाहणी करून घटनास्थळाची माहिती घेतली. तलाठय़ांनी नुकसानाचे प्राथमिक अहवाल तयार करून महसूल विभागाकडे सादर केले आहेत. नुकसानग्रस्तांच्या शासन निर्णयाप्रमाणे तत्काळ मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली.