स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात मतदार वाढणार?
By Admin | Updated: November 4, 2015 02:53 IST2015-11-04T02:53:24+5:302015-11-04T02:53:24+5:30
काँग्रेसची ताकद वाढणार; निवडणूक घोषित होण्याची प्रतीक्षा.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात मतदार वाढणार?
बुलडाणा : विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, या निवडणुकीची घोषणा बाकी आहे. त्यापूर्वीच नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार का, या दृष्टीने चर्चा सुरू झाल्या असून, या सदस्यांना मतदार म्हणून मान्यता मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अर्थकारण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी वेगाने सुरू आहे. तीन जिल्ह्यांमध्ये ७३४ मतदार असून, संभाव्य उमेदवारांनी या मतदारांच्या गाठीभेठी घेऊन आपला प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी जाहीर करून निवडणुकीसाठी आपली सज्जता स्पष्ट केली असली तरी बुलडाण्यात जिल्हा काँग्रेस कमेटी या निवडणुकीच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन चाचपणी करत आहे. या पृष्ठभूमीवर नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनाही सदर निवडणुकीसाठी मतदार होण्याचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालणारे अर्थकारण पाहता नगरपंचायतीच्या सदस्यांची मतदार म्हणून भर पडली तर उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.