हिवरा आश्रम येथे गव्हाचा ट्रक पकडला
By Admin | Updated: December 10, 2014 00:47 IST2014-12-10T00:47:30+5:302014-12-10T00:47:30+5:30
मेहकर येथे पुरवठा विभागाची कारवाई.

हिवरा आश्रम येथे गव्हाचा ट्रक पकडला
मेहकर(बुलडाणा) : तालुक्यातील हिवरा आश्रम येथे पोलिसांनी गव्हाने भरलेला ट्रक ७ डिसेंबर रोजी पकडला होता. दरम्यान, सदर ट्रकमधील गव्हाची अन्न पुरवठा अधिकार्यांनी चौकशी केली आहे; मात्र या संदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
एस. खादर बादशहा रा. ताडपत्री अनंतपूरम आंध्रप्रदेश हे ए.पी. 0२ टी.बी. ७४४४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गहू घेऊन जात होते. दरम्यान, पोलिस कर्मचारी मनोज खुंटे व डोईफोडे यांनी ट्रक चौकशीसाठी थांबविला. याची माहिती ठाणेदार मधुकर शिंदे यांना मिळाल्यावरून ते स्वत: घटनास्थळी गेले व ट्रक पोलिस स्टेशनला घेण्याचे सांगितले. सदर धान्याचा ट्रक पकडलेल्या घटनेची माहिती मेहकर तहसीलदार निर्भय जैन यांना देण्यात आली. दरम्यान, अन्न पुरवठा अधिकारी मानकर यांनी सदर गव्हाचा पंचनामा करून चौकशी केली असता या चौकशी पकडण्यात आलेला सदर गहू हा स्वस्त धान्य दुकानाचा नसून, विवेकानंद आश्रमाचा असल्याचे निष्पन्न झाले. विवेकानंद आश्रमाने अन्न पुरवठा कार्यालय मेहकर यांना दिलेल्या पत्रात सदर गहू हा संस्थानचा असून, दत्तात्रय सोळंकी रा. चिखली यांच्या माध्यमातून राजू अग्रवाल अडते रा. चिखली यांना अधिकृतपणे विक्री केल्याचे नमूद केले आहे. तर अन्न पुरवठा कार्यालय मेहकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गव्हाच्या पोत्यावर शासकीय वितरण व्यवस्थेचा कोणताच ठप्पा नाही. तसेच धान्य तपासण्याची यंत्र सामग्री उपलब्ध नसल्याने हा गहू कंट्रोलचा असल्याचे निश्चित सांगता येत नाही; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता गव्हाचा ट्रक सोडून दिला.