पंचायत समिती सभापतींच्या राजीनाम्यामागे दडले तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:22+5:302021-04-26T04:31:22+5:30
डोणगाव हे नेहमीच चर्चेत राहणारे गाव असून, जिल्ह्यातील राजकारणाच्या अनेक हालचाली येथूनच होतात. मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव ...

पंचायत समिती सभापतींच्या राजीनाम्यामागे दडले तरी काय?
डोणगाव हे नेहमीच चर्चेत राहणारे गाव असून, जिल्ह्यातील राजकारणाच्या अनेक हालचाली येथूनच होतात. मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी हा “ना"राजीनामा असल्याचे डोणगाव येथे बोलले जात आहे. निंबाजी पांडव हे डोणगाव पंचायत समिती सर्कलमधून निवडून आलेले सदस्य असून, त्यांनी गत दोन वेळेस आपला माणूस म्हणून जिल्हा परिषद सदस्यापेक्षा जास्त मते घेत निवडणुकीत विजय संपादन केला आहे. परंतु, पहिल्या वेळेस त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. तर दुसऱ्या निवडणुकीला त्यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारले होते. तेव्हा शिवसेनेला पंचायत समितीची व जिल्हा परिषदेची जागा गमवावी लागली. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट दिले व ते भरघोस मतांनी परत निवडून आले. परंतु, पंचायत समितीचे सभापतिपद राखीव असल्याने त्यांनी उपसभापती पद घेण्याचे नम्रपणे नाकारले. दरम्यान, अडीच वर्षाने सभापतिपद खुले झाल्यानंतर पक्षाने त्यांना सभापती केले. परंतु, पूर्ण कार्यकाळ मिळत असेल तरच सभापती होतो, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले व सभापती झाले. याच कालावधीत कोरोना आला. त्यांचा कार्यकाळ कोरोनात जात असताना अचानक पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितला. एकीकडे कोरोना परिस्थिती, तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींना लागलेले सभापती बदलाचे वेध हे पाहून निंबाजी पांडव यांनी घरगुती कारणाने राजीनामा देत असल्याचे सांगत आपला राजीनामा दिला. याकडे पक्षश्रेष्ठी कसे पाहतात व पुन्हा निंबाजी पांडव यांना न्याय देऊन परत सभापतिपदी विराजमान करतात का, याकडे सध्या डोणगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहले आहे.