आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:44+5:302021-04-27T04:34:44+5:30

जानेफळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. त्याचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...

Weekly market economy stagnates | आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प

आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प

जानेफळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. त्याचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने आठवडी बाजारही बंद आहेत. परिणामी जानेफळ येथील आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प झाले आहेत आणि बाजारावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जानेफळ येथे दर शनिवारी गुरांचा मोठा बाजार भरत असतो़ येथील आठवडी बाजार जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सर्वदूर प्रसिद्ध आहे. दर आठवड्याला या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. यानिमित्त गुरांच्या बाजारात पाणी विक्री, जनावरांचे साहित्य जसे दोरखंड, मोरकी, कासरे, चारा विक्री व चहाचे हॉटेल आधी सामान्य व्यवसाय चालवून अनेक कुटुंबे आपली उपजीविका भागवीत असतात. याशिवाय येथे मोठा आठवडी बाजार भरत असल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांंव्यतिरिक्त मेहकर, चिखली, अमडापूर, येथून भाजीपाला, शेव चिवडा, मसाला, चहा विक्री इत्यादी व्यवसायांसाठी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे जवळपास ५२ खेड्यांचे केंद्र असलेल्या जानेफळ येथे आठवडी बाजारात आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला व इतर मालाच्या खरेदीसाठी महिला व नागरिकांची मोठी गर्दी असते. या आठवडी बाजारामुळे हातगाडे व हमालीद्वारे अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा चालतो आणि ग्रामपंचायतीलासुद्धा करातून उत्पन्न मिळते. त्यामुळे येथील आठवडी बाजार हा अनेक कुटुंबांचा आधार आहे. मात्र गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाच्या संसर्गामुळे येथील आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्पच झाले आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने या बाजारात मोलमजुरी करून उपजीविका भागविणारे तसेच बाजारात छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना संसाराचा गाडा चालविणे मुश्कील झाले आहे.

घरी राहावे तर पोट भरणे अवघड व कामाच्या शोधात बाहेर जावे तर संचारबंदीमुळे काम मिळत नाहीये अशी अवस्था सामान्यांची झाली आहे.

Web Title: Weekly market economy stagnates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.