भेंडवळची घटमांडणी २८ एप्रिल रोजी

By Admin | Updated: April 20, 2017 00:29 IST2017-04-20T00:29:16+5:302017-04-20T00:29:16+5:30

घटमांडणीला ३०० वर्षाची परंपरा : पावसाच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष

On Wednesday, April 28, | भेंडवळची घटमांडणी २८ एप्रिल रोजी

भेंडवळची घटमांडणी २८ एप्रिल रोजी

जयदेव वानखडे - जळगाव जामोद
हंगामाची पीक परिस्थिती, पाऊसपाणी, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी पावसाचे भाकीत काय राहिल याकडे विदर्भातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णानदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा ३०० वर्षापेक्षाही जास्त जुनी आहे. यातील काही भाकीते खरी ठरण्याचा अनुभव लोक घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा भेंडवळच्या मांडणीवर दृढ विश्वास आहे. मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. या मांडणीचे भाकीत ऐकून पुढील हंगामामध्ये शेतात काय पेरायचे ते ठरवत असतात.
आधुनिक हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असले तरी या युगातही भेंडवळची ही परंपरा जीवंत आहे. जनतेच्या मनात दृढ असलेली घटमांडणी ही २८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येईल. तर २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज या मांडणीचे भाकीत जाहीर करतील.
सुर्यास्तापुर्वी गावाबाहेरील शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी केली जाते. घटात घागर, मातीची ढेकळे, पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी ठेवली जाते. गहू, ज्वारी, तूर, उडीद, मुग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदुळ, सरकी, अंबाडी, वाटाणा, मसुर, करडी यासह १८ प्रकारच्या धान्यांची व खाद्य पदार्थांची प्रतिकात्मक मांडणी केली जाते व दुसऱ्या दिवशी पहाटेला सुर्योदयापुर्वी घटमांडणीत झालेले बदलाचे सुक्ष्म निरीक्षण करून यंदाचे भाकीत काय हे सांगितले जाते. या भाकीतापासून पिकांचा आणि पावसाचा अंदाज घेत यावर्षी कोणत्या महिन्यात पाऊस कमी किंवा जास्त प्रमाणात सांगितला हे लक्षात घेवून शेतकरी बांधव यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात.
सर्वप्रथम कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना ३०० वर्षापूर्वी भेंडवळचे चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीस सुरूवात केली. त्याकाळी केवळ याच भाकीताचा आधार घेवून शेतकरी आपली हंगामी पिके घ्यायचा.
गुडीपाडव्याला सुध्दा गावातील मारोतीच्या पारावर मांडणी करण्यात येते व दोन्ही मांडणीत साम्य असते. या दोन्ही मांडणीचे निकष जुळवून यंदाची भविष्यवाणी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ हे २९ एप्रिल रोजी शेतकऱ्यांना कथन करणार आहेत. तेव्हा काय दडले आहे यंदाच्या घटमांडणीत याकडे सर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: On Wednesday, April 28,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.