घराला आग लागल्याने लग्नाचे कापड खाक
By Admin | Updated: May 9, 2017 01:47 IST2017-05-09T01:47:31+5:302017-05-09T01:47:31+5:30
डिग्रस येथील घटना; टेलरिंग व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान.

घराला आग लागल्याने लग्नाचे कापड खाक
देऊळगाव मही : येथील घरच्या लग्न समारंभात व्यस्त असलेल्या छगन कान्हुजी वाळ यांच्या घराला आग लागून टेलरिंगच्या साहित्यासह लग्नाचे शिवण्यासाठी आलेले कापड खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी संध्याकाळी ७.३0 वाजता घडली.
देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु. येथील छगन कान्हुजी वाळ यांच्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने घरातील सर्व मंडळी लग्नसमारंभारात होते. लग्न समारंभानंतर रात्री ११ वाजता गावातील काही नागरिकांनी छगन कान्हुजी वाळ यांच्याकडे धाव घेत तुमच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यावेळी त्वरित छगन वाळ याचे दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य खाक झाले होते. घरी गजानन छगन वाळ यांचा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळे घरात लग्नाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे कपडे शिवण्यासाठी आले होते. मात्र, आगीत साडेतीनशे कपड्यासह घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आग लागल्याची माहिती कळताच डिग्रस बु. येथील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच लक्ष्मण पर्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गजानन छगन वाळ यांना १ हजार १00 रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी तलाठी यांनी पंचनामे करून शासन दरबारी माहिती देऊन पाठपुरावा करण्याची माहिती दिली. यावेळी देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती, सरपंच सैयद, उपसरपंच साहेबराव मघाडे, सदस्य भगवान पाटील, गुलाब पाटील, गजानन वाघ, माजी सरपंच संतोष पाटील, माजी पोलीस पाटील उद्धवराव पाटील, लक्ष्मण देव्हारे, नितीन लाड, बाबूराव पर्हाड, ग्रामसेवक लताताई आरबडे हजर होते. या आगीत छगन वाळ यांच्या घराचे व त्यांच्या मुलाच्या लग्नसराईनिमित्त शिवण्यासाठी आलेले कपडे जळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे वाळ परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे.
कांद्याच्या गंजीला आग; पाच लाखांचे नुकसान
धोत्रानंदई : येथील भानुदास वामन बडधम यांच्या वाकी खु. शेत शिवारातील कांद्याची गंजी व साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ मे रोजी १0 वाजता घडली. यांचे शेत गट क्र.३८ या शेतामध्ये कांद्याचे बियाणेला सकाळी गंजीला अचानक आग लागली. या आगीमध्ये स्प्रिंकलरचे पाइप, पेट्रोल पंप, वायर बंडल, ताडपत्र्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच तलाठी जी.के.केवट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच रामदास डोईफोडे, गजानन गीते, पो.पा.झगन खिल्लारे यांनी शेतकर्याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.