शेतक-यांच्या मढय़ावर विकासाचा मार्ग!

By Admin | Updated: July 27, 2016 00:17 IST2016-07-27T00:17:07+5:302016-07-27T00:17:07+5:30

महामार्गाला एक तुकडाही देणार नसल्याचा बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायती घेणार ठराव.

The way of development of the farmers! | शेतक-यांच्या मढय़ावर विकासाचा मार्ग!

शेतक-यांच्या मढय़ावर विकासाचा मार्ग!

विवेक चांदूरकर / बुलडाणा
नागपूर- मुंबई या महामार्गाकरिता (सुपर एक्स्प्रेस हायवे) जिल्ह्यातील २२ हजार हेक्टर जमीन जाणार असून, शेतकर्‍यांच्या हातची रोजी रोटी हिरावल्या जाणार आहे. त्यामुळे या विरोधात आता शासन विरुद्ध शेतकरी, असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे असून, त्याची ठिणगी महामार्ग संघर्ष समितीच्या निर्मितीने पडली आहे.
नागपूर-मुंबई हे ७१0 किलोमीटरचे अंतर ८ तासात पूर्ण करता यावे, याकरिता शासनाने मुंबई ते नागपूर या सुपर हायवेच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. या महामार्गाकरिता आतापर्यंत सॅटेलाईटद्वारे चार वेळा सर्वेक्षणही करण्यात आले आहे. या मार्गाची आखणी करताना यामध्ये शहरे व गावे, मोठी धरणे, सिंचन प्रकल्प, अभयारण्य, बागायती क्षेत्र असलेली शेती येवू नये, अशी जागा निवडण्यात आली आहे. या मार्गावर सध्या सरळ १२ जिल्हे तर अप्रत्यक्ष २0 जिल्हे जोडली आहेत. या महामार्गामुळे विकास होईल, असा दावा करीत हा विकासाचा मार्ग असल्याचे शासन दाखवित असले, तरी यामध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ४९ गावांमधील २२ हजार हेक्टर शेती जाणार आहे. या शेतकर्‍यांकडे शेती हाच उपजीविकेचा एकमेव मार्ग असल्यामुळे महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. याकरिता संघर्ष समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीने या महामार्गासाठी जिल्ह्यातील कोणत्याही गावातील जमिनीचा एक तुकडाही न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेहकर तालुक्यातील १९ ग्रामपंचायती या महामार्गाला जमीन न देण्याचा ठराव घेणार असून, गुरूवारी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना सादर करणार आहेत. त्यामुळे या महामार्गाविरोधात आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
शासनाच्यावतीने नेहमीच शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहीत करताना मोठमोठी आश्‍वासने देण्यात येतात. एकदा शेतकर्‍यांनी जमीन दिल्यावर त्यांना शासकीय कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. धरणे, रस्ते, वीजखांब यामध्ये जमीन गेलेल्या अनेक शेतकर्‍यांचे हे अनुभव असल्यामुळे आता शेतकरी सावध पवित्रा घेणार आहेत. जमीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शेतकरी ठाम आहेत.

जिल्ह्यातून जाणार ८२ किमीचा रस्ता
नागपूर-मुंबई महामार्गातील ७१0 पैकी ८२ किमीचा रस्ता जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील लोणार, मेहकर व सिंदखेडराजा या तीन तालुक्यातील जमीन या महामार्गात जाणार आहे. या मार्गाला बुलडाणा जिल्ह्यातून दोन कनेक्टीव्हीटी राहणार आहेत. तसेच जिल्ह्यात एका ठिकाणी टाऊनशीपही उभारण्यात येणार आहे.


- तर रस्ता होऊ देणार नाही - ह्यस्वाभिमानीह्णचा इशारा
जिल्ह्यातून नागपूर मुंबई महामार्ग जात असून, हजारो हेक्टर जमीन यामध्ये जाणार आहे. केंद्रिय नेते मोबदल्याबाबत मोठमोठय़ा घोषणा करीत आहेत; मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍यांना १00 मोबदला मिळाला नाही तर हा रस्ता होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन यांनी दिला आहे. जिल्हाभरातील शेतकरी या रस्त्याविरोधात उभे करू रस्त्याचे काम बंद पाडू, असेही त्यांनी सांगितले. शासन केवळ घोषणा करते; मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मोबदला मिळत नाही, असाच प्रकार यावेळी झाला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही, असा इशारा राणा चंदन यांनी दिला.

Web Title: The way of development of the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.