करडी धरणातून पाण्याचा अपव्यय

By Admin | Updated: October 3, 2015 02:33 IST2015-10-03T02:33:15+5:302015-10-03T02:33:15+5:30

अधिका-यांचे दुर्लक्ष ; धरणाच्या गेटच्या रबरशीटची दुरवस्था.

Water wastage from Karadi dam | करडी धरणातून पाण्याचा अपव्यय

करडी धरणातून पाण्याचा अपव्यय

नागेश मोहिते / धाड: नुकत्याच झालेल्या पावसामुळे स्थानिक करडी संग्राहक धरणात सध्या मोठय़ा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे; मात्र धरणाच्या गेटची रबरशीट खराब झाल्यामुळे धरणातून दररोज मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून वाया जात आहे. शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पुरेसे पाणी राहील, याची शाश्‍वती राहिली नाही, याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण पावसाळ्यात वरुणराजाची वक्रदृष्टी राहिली. परतीच्या पावसाने शेतकर्‍यांवर कृपा केल्याने कधी नव्हे ते नदी-नाल्यांना पाणी वाहताना दिसले. यामुळे करडी संग्राहक धरणात अंदाजे साधारण २.३0 दशलक्ष धनमीटर पाणी साचलेले आहे. परिसरातील शेती सिंचनासाठी धरणाची निर्मिती असली तरी धाडसह करडी, बोरखेड, सावळी, चांडोळ, कुलमखेड, सातगाव, कुंबेफळ, टाकळी, डोमरुळ या गावांना धरणाचे परिक्षेत्रातील विहिरीमधून बारमाही पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो. करडी धरणाला असलेल्या ३२ दरवाज्यांना रबरशीट बसवण्यात आल्या आहेत. रबरशीट खराब असल्यामुळे सध्या धरणाचे गेटमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उत्सर्ग होऊन ते पाणी वाहून वाया जात असताना संबंधित लघू पाटबंधारे विभागाचे या बाबीवर लक्ष दिसत नाही. मुळात शेतकरी दृष्काळाच्या झळा सोसत असताना मौल्यवान जलसाठा वाहून वाया जात असून, येत्या काळात शेतीसिंचनासह पिण्याचे पाण्याची समस्या उद्भवणार, हे निश्‍चित आहे. यावर्षी खरीप हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यातच रब्बी हंगामाची तयारी शेतकर्‍यांनी केली असून, सिंचनासाठी पाण्याची गरज पडणार आहे.

Web Title: Water wastage from Karadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.