भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST2017-09-06T00:45:21+5:302017-09-06T00:47:41+5:30
पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.

भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होत असते; मात्र यावर्षी पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे; परंतु तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. नदी, नाले, विहीर, तलाव, धरण अद्याप कोरडेच आहेत. पाण्याची पातळी समाधानकारक नाही. ग्रामीण भागात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी अनेक गावातून प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसातच जर तालुक्यात पाण्याची अशी गंभीर परिस्थिती आहे, तर भविष्यात काय स्थिती असेल? मेहकर तालुक्यात दुर्गबोरी, घुटी, पार्डी, वरवंड, बोथा या गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर शेंदला, लोणीकाळे, निंबा, बार्डा, दुर्गबोरी, घुटी, पार्डी, वरवंड, बोथा या गावच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.