धामणगाव बढे : येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीतर्फे थकीत बिलापोटी २० मार्च रोजी खंडित केला. त्यामुळे गावकऱ्यांपुढे पाणी समस्या निर्माण झाली आहे.
मागील सुमारे आठ ते दहा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतकडे विद्युत बिल थकीत आहे. आज तो आकडा सुमारे ६० लाखांच्या घरात गेला आहे. त्यात मागील दोन वर्षापासून एक रुपयांचे बिल सुद्धा ग्रामपंचायतने भरले नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या तर्फे देण्यात आली. याविषयी वीज वितरण कंपनीचे अभियंता विवेक वाघ त्यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच त्यापूर्वी ग्रामपंचायतीने थकीत बिलाचा भरणा करावा यासाठी वेळोवेळी नोटीस तथा कायदेशीर नोटीस सुद्धा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किमान चालू बिल तातडीने भरून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन आता काय पावले उचलते त्याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु अचानक पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांसमोर कोरोना काळात मात्र पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.