परवानगीत अडकली पाणीपुरवठा योजना

By Admin | Updated: October 15, 2015 00:54 IST2015-10-15T00:54:40+5:302015-10-15T00:54:40+5:30

रेल्वेच्या परवानगीअभावी मलकापूर नगरपालिकेच्या १५ किमी अंतराच्या नवीन पाइपलाइनचे काम रखडले.

Water supply scheme stuck on the permit | परवानगीत अडकली पाणीपुरवठा योजना

परवानगीत अडकली पाणीपुरवठा योजना

मनोज पाटील /मलकापूर (जि. बुलडाणा) : सायफन दुरुस्तीमुळे शहरातील पाणीपुरवठा आठवड्यावर आणत असतानाच तब्बल १३ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत धुपेश्‍वर ते मलकापूर असे १५ किमी अंतराचे भूमिगतरीत्या नवीन पाइपलाइनचेही काम वर्षभरापासून सुरू आहे; पण सद्यस्थितीत महिनाभरापासून रेल्वे प्रशासनाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सदर काम रखडून थांबले आहे. अगदी प्रारंभीच नवीन पाइपलाइनच्या कामाला राष्ट्रीय महामार्गाची निर्माण झालेला अडसर दूर करून या पाइपलाइनकरिता मलकापूरकडे येणार्‍या जुन्या गाड रस्त्याची निवड केली; मात्र येथेही स्थानिक शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतातून पाइप टाकण्यास नकार दिल्याने पुन: जुन्याच मार्गाची निवड करावी लागली. राष्ट्रीय महामार्गाला अडचण निर्माण होऊन बाधा पोहोचू नये, ही काळजी घेत हायवेलगतच्या शेतधुर्‍यावरून पाइपलाइनचे काम सुरु करण्यात आले. अद्यापपावेतो साडेचौदा किमी अंतरापैकी १३ किमी अंतराचे काम पूर्ण झालेले आहे. दरम्यान, ८ ऑगस्ट २0१४ रोजी न.प.ने रेल्वे प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभागाकडे रेल्वे क्रासिंगची रितसर परवानगी मागितली; पण ती वेळेत न मिळाल्याने पाइपलाइनचे काम शहराच्या सीमेवर शिवाजीनगर स्थित रेल्वेच्या लाल पुलापर्यंंंत येवून थांबले आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची त्याला आवश्यकता आहे. असे असतानाच न.प. ला रेल्वे प्रशासनाने ई-मेलद्वारे २९ सप्टेंबर २0१५ रोजी पत्र पाठवून क्रॉसिंग परवान्यासाठी ४0 लाख ७७ हजार २२0 रुपये भरण्याची सूचना केली आहे. ९0 टक्के काम पूर्ण झालेल्या या पाइपलाइनला पहिल्या टप्प्यात ५ कोटी ८४ लाख ६१ हजार रु. व न.प.चा हिस्सा १ कोटी २९ लक्ष ९१ हजार रुपये तर दुसर्‍या टप्प्यात ४ कोटी ६७ लक्ष ६९ हजार असे एकूण जवळपास ९ कोटी ५0 लक्ष रुपये प्राप्त झाले असून, अद्याप उर्वरित निधी शासनाकडून येणे बाकी आहे. पाणी टंचाईमुळे मलकापूरचे नागरिक त्रस्त झाले असून, सुरळीत पाण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.

Web Title: Water supply scheme stuck on the permit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.