वन क्षेत्रातील पाणीटंचाई तीव्र
By Admin | Updated: April 14, 2017 00:08 IST2017-04-14T00:08:33+5:302017-04-14T00:08:33+5:30
बुलडाणा- वन क्षेत्रातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, यंदा पाणवठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

वन क्षेत्रातील पाणीटंचाई तीव्र
कृत्रिम पाणवठ्यांमध्ये दुपटीने वाढ
बुलडाणा : जिल्ह्यातील वन क्षेत्रामधील प्राण्यांना उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन क्षेत्रातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, यंदा पाणवठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. २०१६ मध्ये सातही वन परिक्षेत्रात ४४ कृत्रिम पाणवठे होते. मात्र २०१७ मध्ये पाणवठ्याची संख्या वाढवून ८१ करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील वन परिक्षेत्रालगत ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाणवठे आहेत. यातून वन्य जीवांना सर्वभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरू होताच त्याचा फटका वन क्षेत्रात बसला आहे. परिणामी यंदा जळगाव जा. मोताळा, खामगाव, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर व घाटबोरी वन क्षेत्रातील ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.
या परिस्थितीत वन विभागाकडून वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वन क्षेत्रात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे केवळ ४४ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, यंदा पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, वन्य प्राण्यांसाठी तब्बल ८१ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
६१ पाणवठ्यातील गाळ काढला!
जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांतून वन्य जीवांना बारामही पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सातही वन क्षेत्रातील ६१ नैसर्गिक पाणवठ्यातील गाळ करण्यात आला होतो. जळगाव जमोद वन क्षेत्रातील १९ पाणवठे, मोताळातील सात, खामगाव सात, बुलडाणा १३, देऊळगाव राजा तीन आणि घाटबोरी वन क्षेत्रातील १२ नैसर्गिक पाणवठ्यांचा समावेश आहे.