वनक्षेत्रातील ८0 गावक्षेत्रात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 23:50 IST2017-04-10T23:50:47+5:302017-04-10T23:50:47+5:30
वन विभागाकडून अपु-या उपाययोजना; पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटंकती.

वनक्षेत्रातील ८0 गावक्षेत्रात पाणीटंचाई
बुलडाणा : जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून, सध्या जिल्ह्यातील सातही वन परिक्षेत्रातील जवळपास ८0 बिटमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर वन विभागाकडून उपाययोजना होत असल्या, तरी त्या तत्पुरत्या आहेत. यामुळे वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नोव्हेंबर २0१६ नंतर पाऊस न पडल्यामुळे सध्या जिल्ह्यातील जलस्तर खालावलेला आहे. या जलसंकटाचा फटका जिल्ह्यातील वनक्षेत्राला बसत आहे. यामुळे वन्य जीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परिणामी ते गावाकडे कूच करतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून सात वन परिक्षेत्रात उपाययोजना सुरू आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांमधील पाणी आटल्याने कृत्रिम पाणवठय़ांना पुनरुज्जीवित करण्याचं काम होत आहे. ८१ नवीन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत आहेत. या कृत्रिम पाणवठय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांनाही तहान भागविण्यासाठी टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.