दुरुस्ती केलेल्या कालव्यातून पाझरतेय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:50+5:302021-01-15T04:28:50+5:30
हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनाॅल फुटल्यानंतर त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यातून पाणी पाझरत असल्याने शेतकऱ्यांचे ...

दुरुस्ती केलेल्या कालव्यातून पाझरतेय पाणी
हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनाॅल फुटल्यानंतर त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यातून पाणी पाझरत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी १० दिवसांच्या वर साेडू नये, अशी मागणी रायपूर येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
पेनटाकळी ते सावत्रा येथील शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी पाझरू लागले आहे. या प्रकल्पामुळे १ ते ११ किमीपर्यंतच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी खारवटण्याची भीती निर्माण झाली आहे. जमिनीची पोत खराब होत आहे. या प्रकल्पातून १० दिवसांच्या वर पाणी सोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रायपूर येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर शालिग्राम काळे, काशीनाथ वाहेकर, गजानन काळे, अमोल वाहेकर, कृष्णा वाहेकर, साहेबराव वाहेकर, विजय वाहेकर, दशरथ वाहेकर, वसुदेव थुट्टे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१० दिवसांच्या वर पाणी सोडू नये.
दहा दिवसांनंतर जर सतत पाणी सुरू राहिले तर आतून जमिनी पाझरतात व अतोनात नुकसान होते. हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
बबन वाहेकर, शेतकरी.
कायमस्वरूपी उपाययोजना करा
अनेक कामे अर्धवट राहिलेली असून ती कामे अगोदर पूर्ण करा व नंतर पाणी सोडावे. १ ते ११ किमी पाणी पाइपलाइनद्वारे नेण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करावा तरच परिसरातील शेतकरी समाधानी होईल.
वसुदेव थुट्टे, शेतकरी, रायपूर.