पिकांवरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कष्टावरही फिरलं पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:29+5:302021-09-12T04:39:29+5:30
तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ४८९६३ असून, खरीप हंगामात ४० हजार हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ११८१७, ...

पिकांवरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कष्टावरही फिरलं पाणी
तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ४८९६३ असून, खरीप हंगामात ४० हजार हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ११८१७, कापूस १८२१८, मका ५१८ ,ज्वारी ७५०, मूग ८६८, उडीद ७२६, तूर २५४० हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. पेरणीपासूनच वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण होते. तालुक्यात ७५० मि.मी. पाऊस पडतो. मात्र, सप्टेंबर महिन्यातही सरासरी पूर्ण करताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे संत चोखा सागर प्रकल्पही भरला असून, १९ दरवाजे उघडण्यात आले. सर्वच नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. लहान-मोठे तलाव भरले. सतत होणाऱ्या पावसाने शेतामध्ये पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिके कुजून नष्ट होत आहेत. अतिरिक्त पावसामुळे पिकावर मर रोग येत असून, बुरशी लागणे, पिकांची वाढ खुंटणे, पिके पिवळी पडून जळणे, असे प्रकार उद्भवत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षीदेखील पावसाने तोंडचा घास हिरावला होता. यावर्षी कोरोना संकट हाताला काम नाही तरीदेखील शेतकऱ्यांनी उसनवारी करत कर्ज काढून पेरणी केली. मात्र, निसर्गाने अवकृपा करून चांगली आलेली पिके धोक्यात आणली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे आवश्यक आहे.
सतत होणाऱ्या पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोना महामारी आपत्तीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस संकट वाढते असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिली.
पालकमंत्र्यांकडे मागणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू
तालुक्यात कधी दुष्काळी परिस्थिती, तर ओला दुष्काळ सतत डोके वर काढत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाते. कोरोनामुळे अनेक लोक बरोजगार झाले. ते अनेक वर्षांनतंर शेतीकडे वळले. मात्र, पदरी निराशा दिसत असल्याने चिंताग्रस्त आहे. या नुकसानीबाबतीत आपण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे यांनी सांगितले.