water cup competition : बुलडाणा जिल्ह्याचा बोलबाला; तिन तालुक्यातील ९ गावांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:54 IST2019-08-11T15:50:13+5:302019-08-11T15:54:24+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ या आदिवासी खेड्याची राज्यातील पहिल्या १५ गावांमध्ये निवड झाली.

water cup competition : बुलडाणा जिल्ह्याचा बोलबाला; तिन तालुक्यातील ९ गावांना पुरस्कार
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ९ गावांनी विविध पुरस्कारांवर नाव कोरले प्रस्थापित केले. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ गावाचे वेगळेच वर्चस्व दिसून आले.
पुणे येथील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाणी फांउडेशनचे अध्यक्ष अमीर खान, मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ या आदिवासी खेड्याची राज्यातील पहिल्या १५ गावांमध्ये निवड झाली. दरम्यान, रविवारी पुणे येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील प्रत्येकी तीन गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातून ५४ गावे या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मोताळा तालुक्यातील ५१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ४३ गांवांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातून एकुण १४८ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जिल्हा समन्वय प्रताप मारोडे यांच्या समवेत जळगावचे तालुका समन्वयक ऋषीकेश ढोले, राहुल सिरसाट, वैभव गावंडे, संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, गजानन ढोबाळे, सीमा उमाळे आणि मोताळा तालुका समन्वय बिंदीया तेलगोटे, सतीश राठोड, ब्रम्हदेव गिºहे यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यातील ९ गावांचा सन्मान!
जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ, निंबोरा बु. आणि निंबोरा खुर्द , संग्रामपूर तालुक्यातील उमरा, भिलखेड, सावळा तर मोताळा तालुक्यातील पोफळी, लपाली आणि पोखरी या गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिल्यास्थानी आलेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख रुपये, द्वितीय स्थानी असलेल्या गावांना प्रत्येकी सहा तर तृतीय स्थानी आलेल्या तिनही गावांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
पोपटराव पवारांकडून बांडापिंपळचा विशेष सन्मान!
जळगाव जामोद तालुक्यातील आदीवासी गावाचा पोपटराव पवार यांनी विशेष सन्मान केला. विनोबा भावे, बाबा आमटेंच्या चळवळीतून पुढे आलेल्या आणि सालईबन या निसर्ग प्रकल्पाचे मनजीतसिंह यांच्या पुढाकारात सातपुड्याच्या दुर्गम भागात झालेल्या कामांचा विशेष उल्लेख केला. यावेळी पोपटराव पवार यांनी सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बांडापिंपळ गावाला रस्ता मिळावा ही मागणी देखील मुख्यमंत्र्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली. यावेळी ‘लसून की चटणी बडी मजेदार; बांडापिंपळ पाणीदार’ या शब्दात पवार यांनी बांडापिंपळचा सन्मान केला. पोपटराव पवारांच्या कौतुकाच्या थापेमुळे बांडापिंपळ वासीयांसाठी हा पुरस्कार सोहळा खºया अर्थाने वेगळा ठरला.