पश्चिम विदर्भातील जलसाठय़ांमध्ये भरपावसाळ्यात घट
By Admin | Updated: August 24, 2014 00:49 IST2014-08-24T00:47:52+5:302014-08-24T00:49:38+5:30
आठ दिवसात दोन टक्के जलसाठा झाला कमी; उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट?

पश्चिम विदर्भातील जलसाठय़ांमध्ये भरपावसाळ्यात घट
अकोला : पश्चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात भर पावसाळ्यात झपाट्याने घट होत आहे. गत आठ दिवसात जलसाठा दोन टक्कय़ांनी घसरल्याने, आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची भीती भेडसावू लागली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले असताना, या चार जिल्हय़ांमधील धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणी शिल्लक आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये १५ व २३ जूलै रोजी पावसाने बर्यापैकी हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र दमदार पाऊसच झाला नसल्याने धरणांमध्ये आधीच कमी असलेला जलसाठा आणखी घटत चालला आहे. पाऊस तर नाहीच आणि दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पिभवन होत आहे. ऐन पावसाळ्य़ाच्या मध्यावर हे चित्र निर्माण झाल्याने, भविष्यातील पाणी टंचाईच्या कल्पनेने आताच या भागातील नागरिकांच्या अंगावर शहारे येत आहेत. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. या २0 टक्के जीवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातीलच मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणात ३१ टक्के व उमा धरणात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा तर शून्य टक्के आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड व वाण या प्रकल्पांमध्ये मात्र अनुक्रमे ९0 व ८0 टक्के जलसाठा आहे.
** बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या धरणामध्ये २0.२0 दशलक्ष घनमीटर, म्हणजेच २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यतील ज्ञानगंगा या प्रकल्पात ३८ टक्के, मस धरणामध्ये २६ टक्के, कोराडीत ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा धरणात आजमितीस केवळ १८ टक्के जलासाठा शिल्लक असून, त्या जिल्हय़ातील बोरगाव धरणात १४ टक्के, निम्न पूसमध्ये ४९ टक्के, सायखेडा धरणात ४४ टक्के, गोकी धरणात ४५ टक्के, तर वाघाडी धरणामध्ये ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी या प्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे.