म्युकरमायकाेसिसच्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST2021-05-25T04:38:46+5:302021-05-25T04:38:46+5:30
बुलडाणा : पाेस्ट काेविड रुग्णांना म्युकरमायकाेसिस अर्थात काळी बुरशीचा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे़ या आजाराने ...

म्युकरमायकाेसिसच्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती
बुलडाणा : पाेस्ट काेविड रुग्णांना म्युकरमायकाेसिस अर्थात काळी बुरशीचा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे़ या आजाराने त्रस्त रुग्णांची उपचारासाठी भटकंती हाेत असल्याचे चित्र आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी तेथे शस्त्रक्रियेची सुविधा नसल्याने रुग्णांना औरंगाबादला जावे लागत आहे़ जिल्ह्यात म्युकरमायकाेसिसचे ३५ रुग्ण असून वर्षभरात चाैघांचा मृत्यू झाला आहे़
म्युकरमायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ज्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकेसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. जिल्ह्यातील ३५ जणांना या आजाराची लागण झाली आहे़ या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ तसेच तेथे या आजारावरील इंजेक्शनही उपलब्ध करून दिले आहेत़ त्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे़ मात्र, शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना थेट औरंगाबाद येथे जावे लागत आहे़ तेथेही लाखाेंचा खर्च येत असल्याने सर्वसामान्य रुग्ण आर्थिक संकटात सापडलेले आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू करण्याची घाेषणा पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांनी केली हाेती़ या घाेषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी हाेत आहे़
जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमायकाेसिससाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ तसेच या आजारावरील इजेक्शन रुग्णालयात उपलब्ध आहेत़ त्यामुळे, रुग्णांनी या आजाराला घाबरून न जाता वेळीच उपचार करावा़
डाॅ़ प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा