वकिलाच्या पत्नीची शेगावात आत्महत्या
By Admin | Updated: July 13, 2017 00:38 IST2017-07-13T00:38:58+5:302017-07-13T00:38:58+5:30
छळवणुकीचा आरोप : आरोपींच्या अटकेसाठी प्रेत उचलण्यास नकार!

वकिलाच्या पत्नीची शेगावात आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील एका वकिलाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, सासरच्या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत, आरोपींना अटक होईपर्यंत विवाहितेचे प्रेत हलविण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव रोकडियानगर भागातील अॅड. अनिल सुखदेव वाकोडे यांच्या पत्नी सुजाता वाकोडे (वय ३५) यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी विवाहितेचे वडील बाळकृष्ण दारोकार रा. अटकळी ता. तेल्हारा, जि. अकोला यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की आपल्या मुलीचा सासरकडून पैसे आणण्यासाठी नेहमीच छळ सुरू होता. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सासरच्या मंडळीनी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. सासरच्या मंडळीच्या सततच्या तगाद्याला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस पती अॅड. अनिल वाकोडेसह सासरा सुखदेव वाकोडे, सासू मैनाबाई, दीर अॅड. प्रकाश वाकोडे आणि नणंद अनिता कारणीभूत असल्याचे नमूद केले. आरोपींविरोधात कलम ३०६, ४९८ -अ ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेच्या मागणीसाठी सात तास प्रेत पडून
आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिचा खून केला असल्याने पती व नातेवाईक फरार झाले आहेत. त्यांना अटक होईपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा हट्ट मृतकाच्या नातेवाईकांनी करीत आक्रोश केला. यामुळे रोकडियानगर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. ठाणेदार हूड यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर सात तासांनी सायंकाळी प्रेत शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.