२ कोटी ३४ लाखाचे सावकारी कर्ज माफ!
By Admin | Updated: January 5, 2016 02:09 IST2016-01-05T02:09:43+5:302016-01-05T02:09:43+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ४८ सावकार ; १ हजार १२0 शेतकरी कर्जदार.

२ कोटी ३४ लाखाचे सावकारी कर्ज माफ!
बुलडाणा : विविध बँकांबरोबरच शेतीसाठी खासगी सावकाराकडून शेतकर्यांनी घेतलेले २ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांचे सावकारी कर्ज शासनाने माफ केले आहे. जिल्हास्तरीय समितीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार सदर रक्कम मंजूर केल्यामुळे खासगी सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हा प्रशासनाकडे सावकारी कर्ज असलेल्या शेतकर्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची संबंधित समितीने छाननी करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कर्ज प्रकरणाच्या प्रस्तावावर चर्चा होऊन एकूण १५0 सावकारांच्या ९८२ कर्ज प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. उर्वरित प्रकरणे अद्यापही बाकी आहेत. बुलडाणा, मेहकर, लोणार, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, खामगाव आणि शेगाव या ८ तालुक्यातील ९८२ शेतकर्यांनी १ कोटी ९९ लाख रुपयांच्या सावकारी कर्जमाफीच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. या रकमेवरील व्याज म्हणून ३५ लाख २४ हजार रुपये असे एकूण २ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रकरणाची चौकशी करून त्यातून प्रकरणे मंजूर करण्यात येत आहेत. यात अधिकाधिक शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळावा, याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हास्तरीय समितीकडे आणखी काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहेत. असे असले तरी बरेच शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे शेतकर्यांच्या सावकारी कर्ज प्रकरणात अजूनही अनेक शेतकरी अडकलेले आहेत.