प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना ठेंगा!
By Admin | Updated: July 13, 2016 02:11 IST2016-07-13T02:11:23+5:302016-07-13T02:11:23+5:30
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या दुस-या टप्प्यात अन्याय झाल्याचा शिक्षकांचा आरोप.

प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना ठेंगा!
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
जिल्ह्यातील परंतु बाहेर जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या १३५ शिक्षकांची २१ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पदस्थापना केल्यानंतर दुसर्या टप्प्यात ५ जुलै रोजी १८८ आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र दुसर्या टप्प्यात आंतरजिल्हा शिक्षकांची पदस्थापना न करता सिईटीच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षापासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या पदस्थापन प्रक्रिया राबविण्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत प्रतिक्षेत असलेल्या जवळपास ६00 शिक्षक उमेदवारांनी पदस्थापना करण्याबाबत अर्ज दिले होते.
दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने आंतरजिल्हा बदलीला हिरवी झेंडी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २१ जून रोजी शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रीया सुरू केली. यावेळी १३५ शिक्षकांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत पदस्थापना दिली. बुलडाणा जिल्ह्यात विविध शाळांमध्ये शिक्षकांची ३२३ पदे ही रिक्त होती. त्यापैकी १३५ शिक्षकांना पदस्थापना मिळाल्यानंतर उर्वरित १८८ शिक्षकांची पदस्थापना ५ जुलै रोजी दुसर्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले होते.
मात्र ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना डावलून २0१0 मध्ये सिईटीच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या उमदेवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी दुसर्या टप्प्याच्या प्रतिक्षेत असलेले शिक्षकांमध्ये तिव्र रोष व्यक्त होत आहे.