प्रतीक्षा फक्त काही तासांची
By Admin | Updated: October 19, 2014 00:05 IST2014-10-19T00:05:39+5:302014-10-19T00:05:39+5:30
बुलडाणा जिल्ह्यात सकाळी आठ वाजता मतमोजणी; ‘पोस्टल बॅलट’च्या मोजणीने होणार प्रारंभ.

प्रतीक्षा फक्त काही तासांची
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया येऊन ठेपली असून रविवारी होणार्या मतमोजणीची शनिवारी संध्याकाळी रंगीत तालीमसुद्धा करण्यात आली. आता निकालाची उत्सुकता असून, अवघ्या काही तासात विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल व ११ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल.
जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी पहिला निकाल कुठला जाहीर होणार याबाबत उत्सुकता आहे. मतमोजणीच्या फेर्यांची सर्वात जास्त संख्या सिंदखेडराजा (२३) तर सर्वात कमी सं ख्या बुलडाणा, चिखली व जळगाव जामोदमध्ये (२0)आहे. फेर्यांची संख्या लक्षात घेता निकालाचा पहिला कौल या तीन मतदारसंघातून येण्याची शक्यता आहे; मात्र जळगाव जामोदमध्ये दोन ईव्हीएम असल्याने येथील निकाल उशिरा येईल, त्यामुळे बुलडाणा व चि खलीचा निकाल सर्वात आधी येण्याचे संकेत आहेत.
बुधवारी मतदानाची प्रक्रिया आटोपल्यावर त्या-त्या मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी निवडणुकीचा टक्काही वाढला असून काँग्रेस, शिवसेना, मनसे व भाजप या चार पक्षांमधील चुरसीचे गणित मतदान संपल्यानंतर व गुरुवारी दिवसभर ऐकावयास मिळाले. ठिकठिकाणी मतदानाची टक्केवारी अन् कोणता उमेदवार जिंकेल, याविषयी चर्चा रंगताना दिसल्या. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत.