भयमुक्त वातावरणात मतदारांनी मतदान करावे
By Admin | Updated: October 15, 2014 00:38 IST2014-10-14T23:24:14+5:302014-10-15T00:38:21+5:30
बुलडाणा जिल्हाधिकारी कुरुंदकर यांचे आवाहन.

भयमुक्त वातावरणात मतदारांनी मतदान करावे
बुलडाणा : प्रशासकीय यंत्रणा उद्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सज्ज झाली आहे. मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पाच हजार पोलिस कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी यावेळी दिली. यामध्ये २0५ अधिकारी, ४६५ कर्मचारी, २२६ महिला पोलिस, ९00 पुरूष होमगार्ड, १00 महिला होमगार्डचा समावेश आहे. त्यासाठी २२५ वाहनांची व्यव्यस्था करण्यात आली आहे. सातही मतदारसंघांमध्ये संपर्कासाठी २00 संचांच्या माध्यमातून वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. २३ गावांमध्ये संपर्क होत नसल्यामुळे तेथे लँडलाइन फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर १४ ठिकाणी चेकपोस्ट, तर २0 स्थिर आणि २२ फिरती पथके नेमण्यात आली आहेत.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याची शक्यता असलेल्या ४0५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर, १ हजार ७८ लोकांविरूद्ध अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. प्रचारकाळात उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत अवैध दारूप्रकरणी १0५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सहायक निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, महिती अधिकारी दैठणकर आदी अधिकारी उपस्थित होते.
*जलदगती कारवाई
एखाद्या ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी सेक्टर पेट्रोलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एसआरपीच्या तीन प्लॅटून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. घटनस्थळावर पाच मिनिटांत यंत्रणा पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
*४३५ शस्त्र केले जमा
जिल्ह्यात ५३६ व्यक्तींकडे शस्त्रपरवाना आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ४३५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. एक अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहे.